नबीन सिन्हा, नवी दिल्लीइस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या आणखी एका दहशतवाद्यास दिल्ली पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात आणि जम्मू-काश्मीरसह ११ राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय अन्वेषण संस्था (एनआयए) आणि गुप्तचर संस्थेने (आयबी) दिलेल्या सूचनेच्या आधारे इब्राहिम सय्यद नामक तरुणाला काश्मिरी गेट आयएसबीटी येथे अटक करण्यात आली. सय्यद हा मुंबईच्या मालाड भागात राहणारा आहे. २२ जानेवारीला हरिद्वारमध्ये अटक करण्यात आलेल्या ४ जणांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी उत्तराखंडला जात होता. त्याच्याकडून ८५ हजार रुपये आणि आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले. इसिस आणि इंडियन मुजाहिदीनने भारतात संयुक्त गट स्थापन केला असून, अधिकाधिक तरुणांना आपल्याकडे ओढण्याचे या संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी यासिन भटकळच्या अटकेपासून इंडियन मुजाहिदीनचे देशातील अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. त्यामुळे इतर कारवायांसाठी मुजाहिदीनचे पाकिस्तानातील नेते आता इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ११ जणांना एनआयए कोठडीइसिसची भरती मोहीम राबविण्याच्या आरोपात अलीकडेच देशभरात अटक करण्यात आलेल्या ११ दहशतवाद्यांना स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी ७ दिवसांसाठी राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या (एनआयए) कोठडीत पाठविले.या दहशतवाद्यांना जिल्हा न्यायाधीश अमरनाथ यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींनी जाबजबाबादरम्यान सीरियात इसिससोबत जाऊ इच्छिणाऱ्यांची भरती आणि त्यांना आर्थिक मदत करण्याच्या कामात आपल्या सहभागाची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती काढून घेण्याकरिता आणखी १० दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती एनआयएने केली होती.
इसिसच्या आणखी एका दहशतवाद्यास अटक
By admin | Published: February 06, 2016 3:49 AM