शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ओडिशामध्ये मोठा रेल्वेअपघात झाला. या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला तर ११०० जण जखमी झाले. या अपघाताला काही दिवस उलटतात तोच आज आणखी एका माल गाडीचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. ओडिशा येथील बारगडमध्ये मालगाडीचे ५ रेल्वे डबे रुळावरुन घसरले.
मालगाडी चुनखडीने भरलेली होती आणि बारगड येथे तिचे ५ डबे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात कोणातीही जिवीतहानी झालेली नाही. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या अपघातावर ईस्ट कोस्ट रेल्वेचेही वक्तव्य आले आहे. ही मालगाडी खासगी सिमेंट कंपनी चालवत असल्याचे रेल्वेने सांगितले. ते नॅरोगेज साइडिंगवर चालत होते. रोलिंग स्टॉक, इंजिन, वॅगन, ट्रेन ट्रॅक यासह सर्व पायाभूत सुविधांची देखभाल कंपनी स्वतः करत आहे.
शुक्रवारी ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ११०० जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी १८७ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस लूप लाइनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. यानंतर कोरोमंडलचे अनेक डबे रुळावरून घसरले. हे डबे जवळून जाणाऱ्या यशवंतपूर हावडा एक्स्प्रेसला धडकले.
अहवालानुसार, मालगाडी बहनगा बाजार स्टेशनजवळ लूप लाइनमध्ये उभी होती. दरम्यान, चेन्नईहून हावडाकडे जाणारी १२८४१ कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकाजवळ पोहोचली. कोरोमंडल एक्स्प्रेस मुख्य अप मार्गावरून भरधाव वेगाने जात होती. त्यानंतर ती मेन लाइनवरून लूप लाइनवर आली आणि तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कोरोमंडल एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले आणि तिसऱ्या मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसच्या डब्यांना धडकले. या दोन्ही गाड्यांना बहनगा बाजार स्थानकावर थांबा नाही. दोन्ही गाड्यांचा वेग जास्त होता.