आणखी एका न्यायाधीशाचा बळी: राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:44 AM2018-02-28T00:44:57+5:302018-02-28T00:44:57+5:30
सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी घेत असलेल्या न्यायमूर्तींकडील काम काढण्यामागे सरकारचा दुष्ट हेतू...
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी घेत असलेल्या न्यायमूर्तींकडील काम काढण्यामागे सरकारचा दुष्ट हेतू असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला आहे.
या चकमक खटल्यात अपिलांची सुनावणी करीत असलेल्या न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्याकडे शनिवारी अटकपूर्व जामीन व जामीन अर्जांच्या सुनावणीचे काम दिले गेले. डेरे यांच्या कामात केलेला बदल नेहमीच्या कामाचा भाग असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले. राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरद्वारे हा बदल हेतूत: केल्याचे म्हटले. गांधी म्हणाले की, सोहराबुद्दीन प्रकरणाने आणखी एका न्यायाधीशाचा बळी घेतला आहे. केंद्रीय गुप्तचर खात्याला आव्हान दिलेल्या रेवती डेरे यांना तेथून हलविण्यात आले आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांना न्यायालयात हजर राहा, असे सांगणारे न्या. जे. टी. उत्पात यांना हलविण्यात आले. न्या. लोया यांचाही संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. सुनावणी दरम्यान रेवती मोहिते-डेरे यांनी न्यायालयाला सीबीआयकडून पुरेसे साह्य मिळत नसल्याचे वारंवार म्हटले होते. गांधी यांच्या आरोपाला हा संदर्भ होता.
न्या. उत्पात यांनाही केले होते दूर-
त्या आधी न्या. उत्पात यांनी भाजपाचे तत्कालीन सरचिटणीस अमित शाह समन्स बजावूनही, न्यायालयात हजर राहत नसल्याबद्दल त्यांना खडसावल्यानंतर त्यांना काहीच दिवसांत जून २०१४ मध्ये या खटल्यातून दूर करण्यात आले होते. उत्पात यांच्या जागी न्या. बी. एच. लोया यांची नियुक्ती केली गेली. डिसेंबर २०१४ मध्ये लोया यांचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर, शाह या खटल्यात निर्दोष जाहीर झाले.