नवी दिल्ली : जी व्यक्ती किंवा संघटना भारताला दु:ख देईल, त्यांना अगदी तशाच प्रकारचे दु:ख दिले गेले पाहिजे. परंतु हे दु:ख कसे, केव्हा आणि कुठे द्यायचे, याबाबतचा निर्णय भारताच्या पसंतीवर अवलंबून असायला पाहिजे, असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पठाणकोटच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना पर्रीकर म्हणाले, ‘दुसऱ्यांना इजा पोहोचविणाऱ्यांना अगदी तशाच प्रकारच्या दु:खाची अनुभूती येत नाही तोपर्यंत त्यांच्यात बदल घडून येत नाही, असे इतिहास आम्हाला सांगतो, हे माझे मत आहे. हे सरकारचे मत आहे, असे मानले जाऊ नये. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी पर्रीकरांना याच मुद्यावर प्रश्न विचारले आणि हा मुद्दा अधिक स्पष्ट करण्यास सांगितले. त्यावर पर्रीकर म्हणाले, ‘जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना दु:ख देणार नाही, मग तो कुणीही असो, तोपर्यंत अशा घटनांमध्ये घट होणार नाही, हा पायाभूत सिद्धांत आहे.’ पठाणकोट हल्ल्याचा नामोल्लेख न करता ते पुढे म्हणाले, ज्या सात जवानांनी बलिदान दिले आहे, त्यांचा अभिमान आहे. परंतु या हानीमुळे मला दु:ख झाले आहे. स्वत:चे बलिदान देण्यापेक्षा आपल्या आणि देशाच्या शत्रूंना ठार मारा, असे आपण जवानांना सांगितले पाहिजे. हौतात्म्याचा सन्मान केलाच पाहिजे. पण शत्रूंचा नायनाट करणे ही देशाची गरज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जशास तसे उत्तर हवे
By admin | Published: January 12, 2016 4:28 AM