संरक्षण मंत्र्यांचे निर्देश : सीमेवर पुन्हा शस्त्रसंधी भंगनवी दिल्ली/ जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला दुप्पट ताकदीने उत्तर द्या, असे स्पष्ट निर्देश संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी लष्कराला दिले आहेत़ आठवडाभरात सहा वेळा शस्त्रसंधीचा भंग करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देतेवेळी स्वत:ला रोखू नका, असा सल्लाही संरक्षण मंत्र्यांनी जवानांना दिला. या पार्श्वभूमीवर पर्रीकर पत्रकारांशी बोलत होते़ सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असेल तर भारतीय जवानांनी दुप्पट ताकदीनिशी प्रत्युत्तर द्यायला हवे़ स्वत:ला न रोखता दुप्पट ताकदीने प्रत्युत्तर द्या़ हीच रालोआ सरकारची प्रतिक्रिया आहे, असे पर्रीकर म्हणाले़ गतवर्षीच्या तुलनेत नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांचे प्रमाण घटले आहे़ आंतरराष्ट्रीय सीमेवर मात्र हे प्रमाण वाढले आहे, याकडेही त्यांनी या वेळी लक्ष वेधले़ (वृत्तसंस्था)कठुआ आणि सांबाच्या पट्ट्यात सातत्याने गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका गस्ती दलावर गोळीबार केला़ यात कॉन्स्टेबल श्रीराम गाऊरिया हा जवान शहीद झाला. गेल्या रविवारी जम्मूच्या अरनिया आणि कठुआ जिल्ह्याच्या हीरानगर भागातही गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते़ २५ डिसेंबरलाही पाकी सैन्याने याच दोन क्षेत्रांना लक्ष्य करीत मोर्टार डागले होते. गेल्या २४ तासांत दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकी सैन्याने आज बुधवारी जम्मू-काश्मीरच्या सांबी जिल्ह्यात गोळीबार केला़ यात भारताचा एक जवान शहीद झाला, तर अन्य एक जवान जखमी झाला़ काल मंगळवारीही पाकी सैन्याने जम्मूच्या पल्लनवाला भागात केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान जखमी झाला होता़ पाकिस्तानने ५५० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले़ सन २००३ नंतरचा हा सर्वाधिक मोठा आकडा आहे़ आॅगस्ट ते आॅक्टोबर या काळात भारत व पाकिस्तानदरम्यानच्या गोळीबारात १३ लोक मृत्युमुखी पडले होते आणि हजारो लोक विस्थापित झाले होते़