नवी दिल्ली : दिल्लीतील दंगलींची उत्तरे सरकारकडून मागण्यासाठी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्षाच्या खासदारांनी सोमवारी संसदेतील महात्मा गांधी पुतळ्यापाशी स्वतंत्रपणे धरणे आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवशी हे आंदोलन केले गेले.महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध तीन माकडांची नक्कल करीत खासदारांनी काळ्या कपड्याने डोळे बांधले होते व बोट ओठांवर ठेवून निषेध केला गेला. यात सुखेंदू शेखर राय, मोहुआ मित्रा आदींचा समावेश होता.काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, शशी थरूर आणि इतरांनी गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागणारे व दिल्लीतील दंगलींची उत्तरे मागणारे फलक हाती घेतले होते. ‘आप’चे संजय सिंह, भगवंत मान, एन.डी. गुप्ता आणि सुशील गुप्ता या खासदारांनी दिल्लीतील दंगलीच्या विरोधात गांधी पुतळ्यापाशी निषेधाचे आंदोलन केले. त्यांनी ‘भाजप मुर्दाबाद’ अशा घोषणाही दिल्या.ईशान्य दिल्लीत जातीय दंगलींत किमान ४२ लोक ठार, तर २०० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. दिल्लीतील दंगलींवर लोकसभा आणि राज्यसभेत चर्चा व्हावी यासाठी विरोधी खासदारांनी नोटीसही दिली आहे. ही नोटीस देणाऱ्यांत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी, एन. के. प्रेमाचंद्रन (आरएसपी), पी. के. कुंजलीकुट्टी (मुस्लिम लीग), एलामारम करीम (माकप) आणि भाकपचे बिनोय विश्वम यांचा समावेश आहे.>नवी दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध करीत काँग्रेसच्या खासदारांनी सोमवारी संसदेच्या परिसरात निदर्शने केली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी आणि अन्य सदस्य उपस्थित होते.
दंगलींची उत्तरे द्या; विरोधी खासदारांचे धरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 6:20 AM