ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - उत्तर भारतीय लोकांना नियम मोडण्यात 'आनंद आणि अभिमान' वाटतो असे वक्तव्य केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी केले असून त्यामुळे नवीन वाद उफाळला आहे. राज्यातील महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचा कारभार दिल्ली सरकारच्या स्वाधीन करावा या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रिजीजू यांनी हे वक्तव्य केले आहे. पोलिसांवर आरोप करण्यापूर्वी केजरीवाल यांनी स्वत:ची भूमिका सुधारावी असा सल्लाही रिजीजू यांनी दिला आहे.
उत्तर भारतीय नियम मोडण्याचा आनंद लुटतात, असे वक्तव्य दिल्लीच्या माजी नायब राज्यपालांनी केले होते, त्यावर त्यांनी संध्याकाळी दिलगिरीही व्यक्त केली होती. मात्र मला आता त्यांचे वक्तव्य योग्ये वाटते असे किरण रिजिजू यांनी म्हटले आहे. रिजीजू यांच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेससह भारतीय जनता पक्षानेही निषेध केल्याने त्यांनी या वक्तव्यापासून माघार घेतली आहे.