जोधपूर, दि. 4- काळवीट शिकार प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खान शुक्रवारी जोधपुर जिल्हा न्यायालय न्यायाधीशांसमोर हजर झाला. सलमानने 20 हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करून तो अवघ्या 5 मिनीटांमध्ये कोर्टाच्या बाहेर पडला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 1998 मध्ये झालेल्या काळवीट शिकार प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी सलमानला 4 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. खरंतर ही सुनावणी 6 जुलै रोजी होणार होती. पण काही कारणांमुळे सलमान खान त्यावेळी कोर्टात हजर झाला नव्हता.
जानेवारीमध्ये त्याची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केल्यानंतर राज्य सरकारने मार्चमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाकडे पुन्हा अपील केलं होतं. गेल्यावेळी सलमानच्या पोलीस संरक्षणचा मुद्दा पुढे करत त्याच्या वकिलाने तो हजर राहू शकत नसल्याचं सांगितलं होतं.१९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार केल्याचा आरोप होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १२ ऑक्टोबरला सलमानला अटकही करण्यात आली होती. मात्र, पाच दिवसांनी त्याची जामिनावर सुटका झाली होती. २००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सलमान व्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावरदेखील दोन काळविटाची शिकार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. काळवीटची शिकार करणं, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणं आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर अशा विविध कलमांखाली सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खोटा आरोप लावल्याचं सलमानने दिलं होतं स्पष्टीकरणकाळवीट शिकार प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने जानेवारी महिन्यात दिलासा दिला होता. त्यावेळी सलमानने न्यायालयात त्याच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. सलमानला विचारण्यात आलेल्या ६५ प्रश्नांची उत्तरे देताना त्याने आपल्याला वन विभागाकडून या प्रकरणी मुद्दामहून गोवण्यात येत असल्याचं म्हटलं. मी निरपराध असून, माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे, असं सलमानने न्यायालयात म्हटलं. फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी वन विभाग आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्याने म्हंटलं होतं.