नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत पुन्हा हिंसाचार उसळला आहे. येथील सीलमपूर भागात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली असून डीटीसीच्या तीन बस फोडल्याची घटना घडली.
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस जमखी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सीलमपूरहून आंदोलकांचा मार्च सुरू झाला. त्यानंतर जाफराबादमध्ये मार्च पोहोचल्यानंतर हिंसाचार उसळल्याचे समजते.
सीलमपूर भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर दिल्लीत पाच मेट्रो स्ट्रेशन बंद केली आहे. वेलकम, जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, सीलमपूर आणि गोकुलपूर ही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात सीलमपूरहून आंदोलकांचा मार्च सुरू झाला. त्यानंतर जाफराबादमध्ये मार्च पोहोचल्यानंतर हिंसाचार उसळल्याचे समजते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी पोलिसांनी आज दहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एकही विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, अटक केलेल्या 10 लोकांपैकी 3 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्येकडील राज्यांत उफाळून आलेल्या हिंसाचारानंतर येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आसाम सरकारने राज्यातील कर्फ्यू हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आतापर्यंत 136 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 190 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आंदोलक हे सामान्य नसून त्यांना हिंसा पसरविल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. यामध्ये विविध संघटनांचे प्रमुख नेते आहेत, असे आसामचे पोलीस आयुक्त भास्कर ज्योती महंता यांनी सांगितले.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतातील राज्यांत सुरू असलेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरले असून, त्यात विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात कँटिन, वाचनालय व वर्गात शिरून पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हैदराबाद, तामिळनाडू, लखनऊ, बंगळुरू, चेन्नई, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी काल जोरदार निदर्शने करण्यात आली. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याविरोधात कोलकातामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला.
देशभर काल झालेल्या निदर्शनांत हिंसाचार वा जाळपोळ झाली नाही. आसामसह ईशान्य राज्यांमधील वातावरण तणावपूर्ण असले तरी तिथे अनुचित प्रकार झाला नाही. मुंबईमध्ये आयआयटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांनीही निदर्शने करून सरकारचा निषेध केला आहे. कानपूर, चेन्नई येथील आयआयटी, बंगळुरूसहित दोन ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनीही आंदोलन केले.