नाशिक : अपुर्या पोलीस बळामुळे अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेत खंड पडल्यानंतर महापालिकेने मंगळवारी पोलीस बंदोबस्त मिळताच महात्मानगर आणि कॉलेजरोड परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत रस्त्यांच्या दुतर्फा असलेली ४७ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली, तर रस्त्यांवर व्यावसायिकांकडून ठेवण्यात आलेले ९३ जाहिरात फलक जप्त करण्यात आले. प्रामुख्याने कॉलेजरोडवरील बिग बझारच्या अनधिकृत बांधकामावरही पालिकेने जेसीबी चालविला. तीन महिन्यांपूर्वी गंगापूररोड, पाथर्डी फाटा व पेठरोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविल्यानंतर पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण दर्शवित मोहीम थंडावली होती. दरम्यानच्या कालावधीत महापालिकेने किरकोळ स्वरूपातील अतिक्रमणे हटविली; परंतु मोठी कारवाई होत नव्हती. महापालिकेने पुरेसा पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पोलीस आयुक्तालयाकडे वारंवार स्मरणपत्रे पाठविली; परंतु त्याची दखल घेतली जात नव्हती. मंगळवारी पुरेसा पोलीस फौजफाटा मिळाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने महात्मानगर येथील एबीबी सर्कलपासून अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेस सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी उभारलेले ओटे, पत्र्याचे शेड्स तसेच जाहिरात फलक हटविण्यात आले. त्यात प्रामुख्याने झायकॉन डेंटल क्लिनिक ॲण्ड रिसर्च सेंटरचे अनधिकृत शेड काढण्यात आले. याशिवाय नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक, ठाणे जनता बॅँक यांच्यासमोरील ओटे, पेव्हर ब्लॉक्स हटविण्यात आले. मोहीम सुरू असल्याचे पाहून काही व्यावसायिकांनी स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घेण्यास सुरुवात केली. महात्मानगरनंतर पथकाने कॉलेजरोडवर आपला मोर्चा वळविला. कॉलेजरोडवरील बिग बझारबाहेरील फूड स्टॉल, विजन हॉस्पिटलची संरक्षक भिंत हटविण्यात आली. मोहिमेदरम्यान, ४ वाहने भरून जाहिरात फलक व साहित्य जप्त करण्यात आले. मोहिमेत महापालिकेचे ६० कर्मचारी आणि ४० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. इन्फोबिग बझारचा फूड स्टॉल उद्ध्वस्तपथकाने बिग बझारच्या बाहेर असलेले लोखंडी कंपाउंड हटविण्यास सुरुवात केली तेव्हा बिग बझारच्या व्यवस्थापकांनी त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला. सदर बांधकामाबाबत महापालिकेची परवानगी असल्याचे व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले; परंतु ते कागदपत्रे सादर करू न शकल्याने पथकाने अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालविला. याचबरोबर बिग बझारच्या बाहेर उभारण्यात आलेला फूड स्टॉलही उद्ध्वस्त करण्यात आला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. फोटो- २४ पीएचएमआर १८३कॉलेजरोडवरील बिग बझारसमोरील फूड स्टॉल हटविताना महापालिकेचे पथक.फोटो- २४ पीएचएमआर १७१कॉलेजरोडवरील बिग बझारच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या ट्रॉलीज जप्त करण्यात आल्या.फोटो- २४ पीएचएमआर १८६कॉलेजरोडवरील अनधिकृत संरक्षक भिंत हटविताना पथक.फोटो- २४ पीएचएमआर १९०महात्मानगर व कॉलेजरोड परिसरात मोहीम राबविण्यात आल्यानंतर जप्त करण्यात आलेले फलक व साहित्य.
कॉलेजरोडवर अतिक्रमणविरोधी मोहीम महात्मानगरपासून सुरुवात : ४७ अनधिकृत बांधकामांवर हातोडा
By admin | Published: March 24, 2015 11:06 PM