नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकरी आंदोलकांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला. मात्र सुरुवातीलाच हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेले असून, आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला आहे. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे.केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलक शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर रॅली काढण्याचे नियोजन केले होते. मात्र आज सकाळपासूनच या रॅलीला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आखून दिलेले मार्ग धुडकावत आंदोलक दिल्लीत घुसले. दरम्यान दिल्लीच्या रस्त्यांवर उतरलेल्या शेतकरी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घालत लाल किल्ल्याच्या दिशेने कूच केली.