- हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोलकात्यातील महामेळाव्यात भाजपविरोधी पक्षांच्या तब्बल २२ नेत्यांनी मोदी सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी एकमुखाने शनिवारी रणशिंग फुंकल्याने नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढणार आहे. मोदी यांच्यानंतर कोण? या मुद्द्यावर सर्वांनीच भाष्य करणे टाळले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी मात्र आपल्या भाषणात नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न अत्यंत दुष्कर प्रश्न आहे, असे सांगून, आपण १० महिने का असेना पंतप्रधानपद भूषविले होते, असा वेगळा सूर आळवला.देवेगौडा यांनी एकप्रकारे आपली महत्त्वाकांक्षाच बोलून दाखविली. शरद पवार म्हणाले की, देशाने मोदी यांना पुरेसा वेळ दिला आहे. ते सलग चार वेळा मुख्यमंंत्री राहिले आहेत. आता केंद्राची सत्ता त्यांच्याच हातात आहे. पण आता त्यांच्यामुळेच देश वाचविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आम्हाला काही नको. आता बदल घडविण्याची वेळ आली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की मोदी-शहा यांना घरी पाठविले, तरच देशात अच्छे दिन येतील. अखिलेश यादव आधीच्या दिवसापर्यंत उत्तर प्रदेशाला पंतप्रधानपद मिळाले पाहिजे, असा आग्रह धरीत होते; परंतु त्यांनीही मतभेदाच्या बाबी आज दूर ठेवल्या.>अहंकारी शक्तींचा पराभव करण्याची वेळकाँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही नेतृत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला. खरगे म्हणाले की, आम्हाला बदल हवा आहे. कोणतेही पद नको. सोनिया गांधी यांनी सांगितले आहे की राज्यघटनाविरोधी, अहंकारी आणि विघटनकारी शक्तींचा पराभव करण्याची वेळ आली आहे.
मोदीविरोध हेच ठरले महामेळाव्याचे वैशिष्ट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 6:22 AM