नवी दिल्ली - 2016 मध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांप्रकरणी चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय तपास समितीने उमर खालिद याचे निलंबन कायम ठेवले आहे. तसेच कन्हैया कुमार याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संसदेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू याच्या मृत्यूदिनी 9 फेब्रुवारी 2016 रोजी देश विरोधी घोषणा दिल्या म्हणून खालिदवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच या प्रकरणात कन्हैया कुमार यालाही अटक झाली होती. दरम्यान, या प्रकरणी चौकशी करत असलेल्या पाच जणांच्या उच्चस्तरीय समितीने उमर खालिदचे निलंबन कायम ठेवण्याचा तसेच कन्हैया कुमारला दहा हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय जाहीर केला. याआधी जेएनयूमधील समितीने उमर खालिदसह अन्य दोघांना निलंबित करण्याचा निर्णय दिला होता. तर विद्यार्थ्यांच्या युनियनचा अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारवर दंडात्मक कारवाई केली होती.