नवी दिल्ली : गोरखपूर, फुलपूर आणि त्यानंतर कैराना व अन्य पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे आणि कर्नाटकात येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागून, तिथे काँग्रेस-जनता दलाचे सरकार आल्यामुळे भाजपा नेते जणू बावचळून गेले आहेत. त्यांनी आता विरोधक व त्यांची आघाडी राष्ट्रविरोधी आणि तालिबानी नेता ओसामा बिन लादेनचे समर्थक आहे, असे म्हणायला सुरुवात केली आहे. विरोधक व पाकिस्तानी अतिरेकी हफिज सईद या दोघांची तुलनाही भाजपा नेते करीत आहेत.आताच्या पराभवामुळे अनेक भाजपा नेत्यांना २0१९ च्या लोकसभा निवडणुकांत काय होईल, अशी भीती वाटू लागली आहे. त्यातूनच त्यांनी विरोधी पक्ष व त्यांच्या ऐक्यावर अशा प्रकारची टीका सुरू केली आहे. विरोधक हे माओवादी, जमीनदारी प्रवृत्तीचे (सामंतवादी), जातियवादी व लादेनवादी आहेत, असे भाजपाचे नेते खा. गिरीराज सिंग यांनी म्हटले आहे. अर्थात हे एकत्र आले तरी त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही आणि पंतप्रधान नरेंदझ मोदी यांच्या नेतृत्वाखाली २0१९ च्या लोकसभा निवडणुकांतही भाजपा व एनडीएचाच विजय होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.गिरीराज सिंग नेहमीच अशी वक्तव्ये करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहत नाही. पण यावेळी त्यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि विरोधकांच्या ऐक्याला यश मिळाल्यानेच केले आहेत, असे उघडपणे दिसते. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा हेही आता मागे नसून, त्यांनी विरोधकांची तुलना पाकिस्तानी दहशतवादी व मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद याच्याशी केली आहे. हफिज सईदप्रमाणेच विरोधकांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी नको आहेत, असे ते म्हणाले. नंतर मात्र आपण विरोधक व हफिज सईद यांची तुलना करीत नाही, असेही त्यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार व काळा पैसा याविरोधात कारवाई सुरू केल्यामुळेच सारे विरोधक मोदी यांना विरोध करू लागले आहेत. मोदी यांनी पाकिस्तानात लष्कर घुसवून सर्जिकल स्ट्राइक केल्यामुळे व ते दहशतवाद संपवू पाहत असल्याने हफिज सईद यालाही मोदी नको आहेत, या प्रकारे संबित पात्रा यांनी ही तुलना केली आहे.मौर्य यांना मुख्यमंत्री न केल्याने पराभवउत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी ज्या केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे होती, त्यांच्याऐवजी योगी आदित्यनाथ यांना भाजपाने मुख्यमंत्री केल्यामुळे ओबीसी समाज भाजपावर नाराज आहे. त्यामुळेच त्यांनी पोटनिवडणुकांत भाजपाचा पराभव केला, असे विधान उत्तर प्रदेशातील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केली आहे. राजभर हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून, ते सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. या पराभवाला राज्य सरकारच कारणीभूत आहेत. आता तरी भाजपाने मौर्य की योगी हे नक्की करावे, असेही ते म्हणाले.
विरोधकांची आघाडी राष्ट्रविरोधी-तालिबानी! भाजपा नेत्यांची वक्तव्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 2:04 AM