पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरुद्ध वक्तव्ये केल्याबद्दल राष्ट्रीय जनता दलाने अरारिया येथून निवडून गेलेले पक्षाचे खासदार तस्लिमोद्दीन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुरबे यांनी ही माहिती दिली. मात्र, या नोटिशीला उत्तर देण्यासाठी तस्लिमोद्दीन यांना किती अवधी देण्यात आला आहे, हे त्यांनी सांगितले नाही.राजदचे आणखी एक ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसादसिंग हेसुद्धा नितीशकुमार यांच्या विरोधात वक्तव्ये करीत आहेत. त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे काय? असे विचारले असता पुरबे यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.नितीशकुमार यांच्या विरोधातील राजद नेत्यांची वक्तव्ये अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करीत असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. तस्लिमोद्दीन आणि रघुवंश प्रसादसिंग यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत असतानाच तस्लिमोद्दीन यांना ही नोटीस बजाविण्यात आली.जद (यु)चे प्रवक्ते संजयसिंग म्हणाले की, रघुवंश प्रसादसिंग आणि तस्लिमोद्दीन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केली होती. एक तर त्यांना ‘नियंत्रणा’त ठेवा किंवा निलंबित करा, अशी विनंती आम्ही राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांना केली होती.
नितीशविरोधी वक्तव्ये; तस्लिमोद्दीन यांना नोटीस
By admin | Published: May 23, 2016 3:56 AM