कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरातील समाजमन ढवळून निघाले आहेत. या घटनेविरोधात डॉक्टरांकडून तीव्र आंदोलनं होत आहेत. तसेच बंगालमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या बलात्कार प्रकरणी सुरुवातीला घेतलेल्या भूमिकेमुळे अडचणीत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पावलं टाकण्यात सुरुवात केली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मांडलं आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नेृत्वाखालील सरकारने विधानसभेत मांडलेल्या बलात्कार विरोधी विधेयकामध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना दहा दिवसांमध्ये फाशी देण्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे. त्याबरोबरच प्राथमिक तपासणी अहवाल २१ दिवसांच्या आत सादर करण्याची तसेच जिल्हा पातळीवर टास्क फोर्स स्थापन करण्याची आणि निश्चित वेळेमध्ये सुनावणी पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या या विधेयकाला पाठिंबा देण्याची घोषणा राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने केली आहे.