लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : १९८४ साली दिल्लीत झालेल्या शीखविरोधी दंगलीतील एका हत्या प्रकरणात काँग्रेस पक्षाचा माजी खासदार सज्जनकुमार यांना विशेष न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनावली. १ नोव्हेंबर १९८४ रोजी जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांच्या हत्यांबाबत न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. सज्जनकुमार यांचे तुरुंगातील वर्तन समाधानकारक आहे. शिवाय त्यांचे वय (७९ वर्षे) लक्षात घेता न्यायालयाने फाशी देण्याची मागणी मान्य केली नाही. सज्जनकुमार यांना ही दुसरी जन्मठेप झाली आहे.
सज्जनकुमार यांना न्यायालयाने १२ फेब्रुवारी रोजी दोषी ठरविले होते. त्यांच्या मानसिक स्थितीबाबत तिहार तुरुंगाच्या प्रशासनाकडून दिल्ली न्यायालयाने अहवाल मागविला होता. ज्यात फाशीची शिक्षा दिली जाण्याची शक्यता असते, अशा प्रकरणांत दोषी व्यक्तीबाबत असे अहवाल मागविले जातात. सज्जनकुमार यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी जसवंत सिंग यांच्या पत्नीने न्यायालयाकडे केली. या प्रकरणातील दोषी व्यक्ती सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्या विरोधात प्राथमिक पुरावे उपलब्ध असल्याचे सांगून दिल्ली न्यायालयाने त्यांच्यावर १६ डिसेंबर २०२१ रोजी आरोप निश्चित केले.
न्यायालयाच्या निर्णयाचे पीडितांच्या काही कुटुंबीयांनी स्वागत केले आहे मात्र सज्जनकुमार यांना फाशीची शिक्षा न दिल्याने अनेक परिवारातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काही प्रकरणांच्या अपिलांवर निर्णय प्रलंबित१९८०च्या दशकात सज्जनकुमार हे काँग्रेसचे प्रभावी नेते होते. त्यांना दिल्लीच्या पालम कॉलनीत १ आणि २ नोव्हेंबर १९८४ रोजी झालेल्या पाच व्यक्तींच्या हत्येसाठी दोषी ठरविण्यात आले. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यांनी या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. सज्जनकुमार यांच्याविरुद्ध दिल्ली दंगलीतील आणखी काही प्रकरणांत खटले सुरू आहेत. त्यांना एका प्रकरणात निर्दोष ठरविण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक अपील करण्यात आले आहे.
फाशीची शिक्षा द्या : शिख धर्मियांची मागणीसज्जनकुमार यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी शीख धर्मियांच्या एका गटाने केली. शीखांच्या या गटाचे प्रमुख गुरलदसिंग यांनी सांगितले की, सज्जनकुमारवरील खटला गेली चार दशके सुरू आहे. उशिरा मिळणारा न्याय म्हणजे एकप्रकारे न्याय न मिळण्यासारखेच आहे. १९८४च्या शीखविरोधी दंगली पूर्वनियोजित होत्या. त्यामुळे सज्जनकुमार यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी.
पहिला गुन्हा ९१ साली१९९१ : या प्रकरणात एफआयआर नोंदविण्यात आला.८ जुलै १९९४ : या प्रकरणात सज्जनकुमार यांच्याविरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत, असे दिल्ली न्यायालयाने सांगितले. त्यामुळे आरोपपत्र दाखल झाले नाही.१२ फेब्रुवारी २०१५ : केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.२१ नोव्हेंबर २०१६ : एसआयटीने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा अधिक सखोल तपास होणे आवश्यक आहे.६ एप्रिल २०२१ : सज्जनकुमार यांना अटक करण्यात आली.५ मे २०२१ : पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.२६ जुलै २०२१ : न्यायालयाने आरोपपत्रावर सुनावणी करण्यास होकार दिला.१६ डिसेंबर २०२१ : सज्जनकुमार यांच्यावर न्यायालयाने हत्या, दंगल, इतर गुन्ह्यांसाठी आरोप निश्चित केले.३१ जानेवारी २०२४ : न्यायालयाने याप्रकरणी अंतिम युक्तिवाद ऐकण्यास प्रारंभ केला.८ नोव्हेंबर २०२४ : न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.१२ फेब्रुवारी २०२५ : सज्जनकुमार यांना न्यायालयाने दोषी ठरवले.२५ फेब्रुवारी २०२५ : न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.