भारतीय सैन्याने आणि हवाई दलाने डीआरडीओसोबत मिळून २४ तासांत हेलिना मिसाईलची दुसरी चाचणी घेतली आहे. पोखरणनंतर लगेचच हिमालयाच्या कुशीत ही चाचणी घेण्यात आली आहे. इथे देखील हेलिनाने लक्ष्य अचूक भेदले आहे.
हिमालयात हे मिसाईल अॅडवान्स लाईट हेलिकॉप्टरमधून डागण्यात आले होते. राजस्थानमधील पोखरण येथे अँटी टँक गायडेड मिसाईल हेलिनानं सर्व मानकांची पूर्तता करत सिम्युलेटेड टँक उद्ध्वस्त केला. २४ तासांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अँटी गायडेड मिसाईलच्या चाचण्या घेण्यामागे मोठे कारण आहे.
या भागामध्ये चिनी आक्रमणाचा धोका आहे. काश्मीर आणि लडाखची परिस्थिती सारखीच आहे. यामुळे या पहाडी भागातील परकीय आक्रमणावेळी हे मिसाईल कसे काम करते, उंचीवरून डागले तर ते समोरील लक्ष्य किती अचूक भेदते यासाठी ही चाचणी घेण्यात आली. यासाठी हेलिकॉप्टरचे अंतरही दूर ठेवण्यात आले होते. हे पाहण्यासाठी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी, डीआरडीओचे वैज्ञानिक उपस्थित होते.
काय आहेत वैशिष्टेइन्फ्रारेड इमेजिंग सीकर (IIR) तंत्रज्ञान या मिसाईलला मार्गदर्शन करते. मिसाईल लाँच केल्यानंतर हे तंत्रज्ञान सक्रिय होतं. हे जगातील सर्वोत्तम आणि अत्याधुनिक अँटी टँक हत्यारांपैकी एक आहे. भारतीय लष्कर आणि हवाईदलाच्या हेलिकॉप्टरवर हे मिसाईल तैनात करण्याची तयारी सुरू आहे. खरं तर याचं नाव हेलिना आहे परंतु याला ध्रुवास्त्र असंही म्हटलं जातं. याचं यापूर्वी नाव नाग मिसाईल (Nag Missile) असं होतं. भारतात तयार करण्यात आलेलं हेलिना मिसाईल (Helina Missile) २३० मीटर प्रति सेकंदाच्या वेगानं जाते. म्हणजेच याचा वेग ८२८ किलोमीटर प्रति तास आहे. या मिसाईलपासून वाचण्यासाठी शत्रूला वेळच मिळणार नाही.