विकास झाडेनवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या अभियांत्रिकी दुहेरी पदवी कार्यक्रमात ‘दहशतवादविरोधी’ हा नवा अभ्यासक्रम जोडल्याबद्दल वाद निर्माण झाला आहे. किंबहुना या विषयाच्या माध्यमातून दहशतवादाचा सामना कसा करावा, हे विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहे.
डाव्या संघटनांनी मात्र या विषयाच्या समावेशाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जेएनयू स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्राध्यापक आणि अध्यक्ष अरविंद कुमार यांच्या मते, बी.टेक. केल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आहे. जिहादबाबत विविध देशांना परस्पर सहकार्याची गरज आहे. जगातील दहशतवाद रोखण्यासाठी जागतिक शक्तीची भूमिका स्पष्ट होईल. विशेषत: दक्षिण आशियातील भू-राजकारणावर त्याचा मोठा प्रभाव आहे आणि त्याबद्दल वाद घालत असलेल्यांनी ही गोष्टही पाहिली पाहिजे की, सायबर आणि आर्थिक दहशतवादही या विषयाचा भाग बनला आहे. जेएनयूचे कुलगुरू प्रा. एम. जगदीश कुमार म्हणाले की, अभियांत्रिकीमध्ये दुहेरी पदवी कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधदेखील शिकविले जातात. त्यात ‘दहशतवादविरोधी’ या नव्या अभ्यासक्रमाची भर पडली आहे.