नवी दिल्ली : कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) मोहीम सुरू आहे. आतापर्यंत नागरिकांना 75 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस युवकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे, परंतु या दरम्यान एका अभ्यासाने (Study on Vaccine) चिंता वाढवली आहे. दरम्यान, ज्या लोकांनी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांच्यामधील अँटीबॉडीजचा स्तर दोन-तीन महिन्यांनी कमी होऊ लागतो, असे आयसीएमआर- प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रला (भुवनेश्वर) आढळले आहे.
यासंदर्भात 'आज तक/इंडिया टुडे' शी डॉ. देवदत्त भट्टाचार्य यांनी चर्चा केली. यावेळी डॉ. देवदत्त भट्टाचार्य म्हणाले की, आम्ही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींच्या एकूण 614 सहभागींचा अभ्यास केला आहे. आम्ही त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होताना पाहिले आणि सहा महिन्यांपर्यंत त्याला फॉलोअप केले. हा या दीर्घकालीन अभ्यासाचा एक भाग आहे. दरम्यान, आम्ही दोन वर्षांपासून अँटीबॉडीजवर लक्ष ठेवणार आहोत.
ते पुढे म्हणाले, अभ्यासात आम्हाला आढळले आहे की, ज्यांनी कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले होते, त्यांच्यामध्ये दोन महिन्यांनंतर अँटीबॉडीज कमी होण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे, कोविशिल्ड घेणाऱ्या लोकांमध्ये तीन महिन्यांनंतर अँटीबॉडीज कमी होऊ लागली. दरम्यान, या अभ्यासाचा उद्देश सार्स-सीओवी-2 (कोरोना व्हायरस) च्या विरोधात दिल्या जाणाऱ्या लसीच्या अँटीबॉडीजविषयी माहिती मिळवणे आहे.
आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड मिळाल्यानंतर 24 आठवडे त्यांच्यामध्ये काही बदल आहेत का? हे पाहण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. या वर्षी मार्च महिन्यात हा अभ्यास सुरू करण्यात आला, असे आयसीएमआर आणि आरएमआरसीने केलेल्या या अभ्यासाबद्दल असे सांगण्यात आले.
अँटीबॉडीज कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या चिंतेबाबत आयसीएमआर-आरएमआरसीचे संचालक संघमित्रा पाटी म्हणाले की, अँटीबॉडीजमध्ये घट झाली असली तरी अँटीबॉडीज कायम आहेत आणि आम्ही त्यांचे सतत निरीक्षण करत आहोत. त्यात आठ आठवड्यांत घट दिसून आली आहे म्हणून आम्ही सहा महिन्यांनंतर त्याला फॉलो करू आणि येणाऱ्या काही काळासाठी त्यावर लक्ष ठेवण्याची आमची योजना आहे. त्यानंतरच आम्ही बूस्टर डोसची आवश्यकता आहे की नाही हे सांगू शकू.
सीरमचे नमुने 614 सहभागींकडून गोळा केले गेले आणि त्यांचे गुणात्मक आणि परिमाणात्मक दोन्ही स्वरूपात SARS-CoV-2 अँटीबॉडीजचे परीक्षण करण्यासाठी दोन CLIA-आधारित प्लॅटफॉर्ममध्ये चाचणी करण्यात आली. या लोकांपैकी 308 (50.2%) लोकांना कोविशिल्डची लस देण्यात आली होती, तर उर्वरित 306 (49.8%) लोकांना कोवॅक्सिनची लस देण्यात आली होती.
दरम्यान, आरएमआरसी भुवनेश्वर, इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्स भुवनेश्वर, केआयएमएस (कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) भुवनेश्वर, एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल बेरहामपूर आणि चेस्ट क्लिनिक, बेरहामपूर येथील 24 संशोधकांनी अभ्यासात भाग घेतला.