नवी दिल्ली/ कराची : कराचीत सुरू होणाऱ्या साहित्य महोत्सवाला मी जाणार होतो; मात्र पाकिस्तानने माझा व्हिसा नाकारला, असा दावा ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी केला आहे. पाकच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयाने मात्र खेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नवा राजकीय वाद उभा राहिला आहे. चार दिवसांच्या महोत्सवाचे १८ भारतीयांना निमंत्रण देण्यात आले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद आणि अभिनेत्री नंदिता दास यांनाही प्रवासाचे दस्तऐवज मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिसा नाकारल्यामुळे मी निराश आणि दु:खी झालो आहे. मी सातत्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित करीत आलो असून, देशभक्त या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समर्थक राहिलो असल्यानेच मला व्हिसा नाकारण्यात आला नाही ना, असा सवाल खेर यांनी केला.मी व्हिसासाठी अर्ज केला नाही, हा पाकिस्तानी उच्चायुक्तांचा दावा हास्यास्पद आहे. व्हिसा नाकारल्यामुळे आयोजकांची अडचण झाली. त्यांनी माझी माफीही मागितली आहे. हा मुद्दा पाकिस्तानकडे उपस्थित करण्याची विनंती मी केंद्र सरकारला करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. व्हिसा नाकारण्यात येण्यामागची कारणे आम्हाला माहीत नाहीत. व्हिसा दिला जाणार नसल्यामुळे खेर यांना अर्ज सादर करण्यास सांगू नका, असे आम्हाला उच्चायुक्तालयाने कळविले होते, असे कराची साहित्य महोत्सवाच्या प्रवक्त्या अमीना सईद यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)उर्वरित सर्व निमंत्रितांना व्हिसा देण्यात आला. केवळ मला तो नाकारण्यात आला आहे. आम्ही पाकिस्तानच्या कलाकारांचे भारतात स्वागत करतो. - अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेतेखेर यांनी व्हिसासाठी अर्जच केला नाही. त्यामुळे त्यांना व्हिसा देण्याचा किंवा नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.- मंझूर मेनन, प्रसिद्धी प्रमुख, पाकिस्तान उच्चायुक्तालयहे दुर्दैवी - भाजपाएखाद्या देशाला कुणाला व्हिसा नाकारायचा किंवा नाही हा अधिकार असला तरी पाकच्या या कृतीमुळे दोन देशांमधील संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला धक्का बसला आहे, असे भाजपाचे सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी सांगितले.
अनुपम खेर यांना पाकचे द्वार बंद
By admin | Published: February 03, 2016 3:53 AM