मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करण्याखेरीज अनुपम खेर यांनी अशी काय कामगिरी करून दाखवली की त्यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली, असा सवाल अभिनेते आणि कथा, पटकथा लेखक कादर खान यांनी केल्यामुळे एक नवा वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीतील तारे-तारकांची नावे पाहून, मला हा पुरस्कार मिळाला नाही, हे चांगलेच झाले, असेही कादर खान यांनी बोलून दाखवले आहे. दिल्लीतील नेत्यांच्या आगेमागे करणाऱ्या अनेकांनाच हा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. मी आजतागायत कोणाची हांजी हांजी केली नाही आणि यापुढेही करणार नाही, असे नमूद करून, अशा व्यक्तींना हे पुरस्कार मिळत असतील, तर ते मला नको, असे त्यांनी म्हटले आहे. पद्मश्रीसाठी माझी निवड झाली नाही, हे चांगलेच झाले, अशी टिप्पणी करून ते म्हणाले की, सुरुवातीला या पुरस्कारामध्ये प्रामाणिकपणा असायचा. पण तो आता राहिलेला नाही. आता लोक स्वार्थी झाले आहेत. पुरस्कार देण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत मला काही म्हणायचे नाही. पण माझ्यात अशी काय त्रुटी होती की माझी पुरस्कारासाठी निवड झाली नाही, हे मात्र मला समजून घ्यायचे आहे, असेही कादर खान यांचे म्हणणे आहे.हिंदू म्हणवून घ्यायलाही घाबरतो - खेरकादर खान यांच्या या प्रतिक्रियेवर अनुपम खेर काहीही बोललेले नाहीत. मात्र, मी हिंदू आहे, असे सांगायलाही मी घाबरतो. मी हिंदू आहे, असे बोलून दाखवले आणि कपाळावर टिळा लावला तर माझ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस म्हणून शिक्का मारला जाईल, असे अनुपम खेर यांनी बोलून दाखवले. दादरीची घटना दुर्दैवी होती, यात वादच नाही. पण मालदा येथील घटनेचे काय, काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचे काय, असे सवाल अनुपम खेर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केले.
अनुपम खेर यांना पद्मभूषण कशासाठी?
By admin | Published: January 31, 2016 3:25 AM