पुणे : आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये व्यस्त असल्याने फिल्म अॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाला (एफटीआयआय) वेळ देऊ शकणार नसल्याचे सांगत अनुपम खेर यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि एफटीआयआय सोसायटी स्थापनेस झालेला विलंब यामुळे केंद्र सरकारने जाब विचारल्यानेच खेर यांनी राजीनामा दिल्याचे समजते. मात्र अलीकडेच ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरील चित्रपटाच्या शूटिंगनंतर अनुपम खेर यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. ते भाजपा व केंद्र सरकारला खटकले असावे. त्यातूनच खेर यांना राजीनामा द्यावा लागला असावा, अशी जोरदार चर्चा आहे. एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना विद्यार्थ्यांनी विरोध केल्याने त्यांना मुदतवाढ न देता खेर यांना अध्यक्ष केले. सुरुवातीला त्यांनी जोमाने काम सुरू केले.‘सरप्राइज’ भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून अडचणी सोडविण्याचे आश्वासनही दिले. मात्र, शूटिंगसाठी ते परदेशात निघून गेले आणि काहीच घडले नाही. नियामक मंडळाने एका वर्षात किमान तीन बैठका घेणे गरजेचे असते. मात्र, दीर्घ काळ एकही बैठक झाली नाही. अखेर मंगळवारी मुंबई येथे तातडीने बैठक घेण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे बैठकही झाली. नियामक मंडळ आणि विद्या परिषदेची स्थापना दोन दिवसांपूर्वी झाली. बैठकीला खेर यांच्यासह नवनियुक्त उपाध्यक्ष बी. पी. सिंग, अभिनेत्री दिव्या दत्ता, प्रा. अर्चना राकेश सिंग, संचालक भूपेंद्र कॅन्थोला आदी हजर होते. अभिनेते सतीश कौशिक यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. या बैठकीचा अजेंडा विद्यार्थीकेंद्रित होता. त्यानंतर काही तासांतच खेर यांनी राजीनामा दिला. संस्थेच्या सोसायटीची स्थापना न झाल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना संस्थेला अडचणी येत होत्या. यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्रे पाठविली होती. त्यानंतर दीड महिन्यापूर्वी सोसायटीची स्थापना करण्यात आली.
बैठकीत मौन, त्यानंतर राजीनामानाट्यमुंबईत झालेल्या एफटीआयआयच्या बैठकीत अनुपम खेर यांनी राजीनाम्याबाबत मौन बाळगले. मात्र, बैठकीमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना पत्र पाठविले आणि राजीनामा दिल्याचे टिष्ट्वटरवरून जाहीर केले.