केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यूपीमधील मिर्झापूरला पोहोचल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनुप्रिया पटेल रागाने पोलीस अधिकाऱ्यांना फटकारताना दिसत आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला आणि मुलीचा विनयभंग प्रकरणी पोलिसांच्या कामावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना २ तासांचा अल्टिमेटम दिला आणि लवकरच एफआयआर नोंदवण्यास सांगितला.
काही वेळातच त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. काही गुंडांनी अनुप्रिया पटेल यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला होता, ज्यात कार्यकर्ता गंभीर जखमी झाला होता. अनुप्रिया काल त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही किंवा मुलीची वैद्यकीय तपासणीही झाली नसल्याचं समजल्यावर त्या संतप्त झाल्या.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी रुग्णालयात उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की, अद्याप कोणतीही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, वैद्यकीय तपासणीही झालेली नाही. ही अत्यंत शरमेची बाब आहे. मी २ तासांचा वेळ देत आहे, आरोपींवर कारवाई न झाल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल.
पोलीस/प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे बघत अनुप्रिया पटेल पुढे म्हणतात – संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत, ६ वाजेपर्यंत रिपोर्ट हवा आहे. या प्रकरणात काय केलं? तुम्ही लोक काही करत नसाल तर बघा मी काय करते, ही गुंडगिरी चालणार नाही, मी खपवून घेणार नाही. घरात घुसून कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे, मुलींना पळवून नेलं जात आहे. हे सर्व चालणार नाही.
हे संपूर्ण प्रकरण विंध्याचल पोलीस स्टेशन हद्दीतील कुरोठी गावातील आहे, जिथे अजय पटेल, त्यांची पत्नी आणि मुलगी यांनी आरोप केला आहे की, गावातील गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. विरोध केल्यावर त्यांनी मुलीचं अपहरण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांना मारहाण करण्यात आली. जखमी अजय पटेल हे अपना दल एसचे कार्यकर्ते आहे. त्यांना पाहण्यासाठी अनुप्रिया पटेल रुग्णालयात पोहोचल्या होत्या.