लखनऊ: पुढील वर्षी पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. यापैकी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर भारतीय जनता पक्षानं लक्ष केंद्रीत केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. भाजप नेतृत्त्व आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू असताना योगींनी थेट दिल्ली गाठली. तिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर आता उत्तर प्रदेशच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. शिवसेना, शिरोमणी अकाली दल यासारखे जुने मित्रपक्ष गमावणाऱ्या भाजपनं आता मित्रांना सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.भाजपला मोठा भाऊ करणारा 'मोदींचा हनुमान' सापडला संकटात; छोटा भाऊ ५ खासदार फोडणार?
वाराणसी आणि लगतच्या भागांमध्ये जनाधार असलेल्या अपना दलाला भाजपकडून लवकरच मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. अपना दल (एस)च्या नेत्या अनुप्रिया पटेल आणि त्यांचे पती आशिष पटेल यांना मंत्रिपदं मिळू शकतात. काही दिवसांपूर्वीच अनुप्रिया पटेल यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यांना लवकरच मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. तर योगींच्या मंत्रिमंडळात आशिष पटेल यांना संधी मिळू शकते. आशिष पटेल विधान परिषदेचे आमदार आहेत.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत आहे. निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. निवडणुकीत मित्रपक्षांना नाराज ठेवून चालणार नसल्याची कल्पना असल्यानं भाजपकडून अपना दलाला विशेष गिफ्ट दिलं जाऊ शकतं. ओबीसी समाज अपना दलाचा मतदार समजला जातो. त्यामुळे भाजप अपना दलाला सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहे. अनुप्रिया पटेल यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार का, असा प्रश्न त्यांचे पती आशिष यांना शहांसोबतच्या भेटीनंतर विचारण्यात आला. मात्र त्यांनी यावर फारसं काही बोलण्यास नकार दिला. शहांसोबतची भेट औपचारिक स्वरुपाची होती असं त्यांनी सांगितलं.