भाजपच्या अडचणीत वाढ, विरोधकांच्या 'या' मागणीला अनुप्रिया पटेल यांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 03:53 PM2024-07-31T15:53:09+5:302024-07-31T15:55:29+5:30

Anupriya Patel : सध्या लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजला आहे. आता एनडीएच्या सहयोगी आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनीही या मुद्द्यावर एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे.

anupriya patel support demand of congress and samajwadi party on caste censes | भाजपच्या अडचणीत वाढ, विरोधकांच्या 'या' मागणीला अनुप्रिया पटेल यांचा पाठिंबा

भाजपच्या अडचणीत वाढ, विरोधकांच्या 'या' मागणीला अनुप्रिया पटेल यांचा पाठिंबा

नवी दिल्ली : सध्या लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा गाजला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून सरकारला धारेवर धरलं आहे. आता एनडीएच्या सहयोगी आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनीही या मुद्द्यावर एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे. अनुप्रिया पटेल यांनी जातनिहाय जनगणनेचं उघड समर्थन केलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अनुप्रिया पटेल यांनी जातनिहाय जनगणनेचं समर्थन केलं. तसंच, आपल्याकडं जातींच्या संख्येबाबत अधिकृत डेटा असणं आवश्यक असल्याचं अनुप्रिया पटेल यांनी सांगितले. मात्र, यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीवरही निशाणा साधला. समाजवादी पार्टी आज या मुद्द्यावर बोलत आहे, पण ते सरकारमध्ये असताना त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही, असंही अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं.

समाजवादी पार्टी चार वेळा सत्तेत होता, मुलायम सिंह यादव तीनदा मुख्यमंत्री होते आणि एकदा अखिलेश यादव यांचं सरकार होतं. त्यांनी कधी जातनिहाय जनगणनेबद्दल बोललं होतं का? पण, आता सत्तेत नसताना ते बोलत आहेत. पाठोपाठ निवडणुकांमध्ये पराभव होत आहे, त्यामुळं ते हा मुद्दा उपस्थित करत आहेत. नितीशकुमार यांना जातनिहाय जनगणना करायची होती, त्यांनी ती पूर्ण करून घेतली. मग तुम्ही ते का पूर्ण केलं नाही? असा सवाल करत अनुप्रिया पटेल यांनी समाजवादी पार्टीवर निशाणा साधला.

पुढे अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं की, "जातनिहाय जनगणनेला आमचा पाठिंबा आहे. कारण भारतीय समाज वर्षानुवर्षे अनेक जातींमध्ये विभागला गेला आहे. आमच्याकडे सर्व जातींच्या संख्येची अधिकृत आकडेवारी असणं आणि देशातील सर्व समुदायांचा न्यायिक व्यवस्थेपासून नोकरशाही आणि विभागांपर्यंत प्रत्येक गोष्टीत वाटा असणं महत्त्वाचं आहे. सर्वांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा." 

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षात असलेली इंडिया आघाडी यांच्यामध्ये अनेक मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. जातीनिहाय जनगणनेवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मंत्री अनुराग ठाकूर भिडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आता एनडीएच्या सहयोगी आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनीही या मुद्द्यावर एकप्रकारे पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळं या मुद्द्यावरून भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 

Web Title: anupriya patel support demand of congress and samajwadi party on caste censes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.