तिरुवनंतपुरम : आपण ख्यातनाम पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची रक्ताची मुलगी असल्याचा दावा करमाला मोडेक्स या ४५ वर्षीय महिलेने केला असून, तसा जाहीरनामा मिळविण्यासाठी येथील कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आहे.करमाला विवाहित असून, त्यांना तीन मुले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या दाव्याच्या आधारे न्यायालयाने अनुराधा पौडवाल व त्यांच्या दोन मुलांना येत्या २२ जानेवारीस हजर होण्याचे समन्स काढले आहेत. अनुराधा आणि त्यांचे संगीतकार पती अरुण पौडवाल यांनी आपले पालकत्व नाकारले, तर ते सिद्ध करण्यासाठी ‘डीएनए’ चाचणी करण्यात यावी, अशी मागणी करमाला यांनी दाव्यात केली आहे.बालपणात आणि पुढील आयुष्यातही वास्तविक जे सुख मिळायला हवे होते, ते नाकारल्याबद्दल पौडवाल दाम्पत्याने ५० कोटी रुपये भरपाई द्यावी, तसेच या दाव्याचा निकाल होईपर्यंत पौडवाल यांना त्यांच्या कोणत्याही मालमत्ता विकण्यास मनाई करावी, अशीही त्यांनी न्यायालयास विनंती केली आहे.करमाला यांनी म्हटले आहे की, आयुष्यभर ज्यांना आपण वडील मानले त्या पोन्नाचेन यांनी मृत्यूच्या काही दिवस आधी ‘मनावरील ओझे कमी करण्यासाठी’ आपण अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचे उघड केले. करमाला यांच्या म्हणण्यानुसार मृत्युशय्येवरील पोन्नाचेन यांनी त्यांना सांगितले की, पूर्वी भारतीय लष्करात नोकरी करीत असताना ते महाराष्ट्रात नियुक्तीवर होते व तेथे त्यांची अनुराधा पौडवाल यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी अनुराधा पौडवाल यांना एक मुलगी (म्हणजेच आताची करमाला) झाली. गायन व्यवसायाच्या व्यग्र दिनचर्येत मुलीचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही, असे सांगून अनुराधा पौडवाल यांनी चार दिवसांची मुलगी आपल्या स्वाधीन केली. (वृत्तसंस्था)आईलाही नव्हते माहीतआपण जिला लहानाचे मोठे केले ती अनुराधा पौडवाल यांची मुलगी आहे हे माझी सांभाळ करणारी आई अॅग्नेस हिलाही माहीत नव्हते, असा दावाही करमाला यांनी केला आहे.करमाला यांच्या म्हणण्यानुसार केरळमधील पोन्नाचेन आणि अॅग्नेस या दाम्पत्याने त्यांच्या तीन मुलांसोबत सांभाळ करून आपल्याला लहानाचे मोठे केले.पोन्नाचेन यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून सध्या ८५ वर्षांच्या असलेल्या अॅग्नेस ‘अल्झायमर’ विकाराने आजारी आहेत.
अनुराधा पौडवाल यांची मुलगी असल्याचा दावा; महिलेची कोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 2:16 AM