अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या सोहळ्याकडे सर्व देशवासियांचं लक्ष लागलं आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने मंदिरात दरवाजे बसवण्याचं कामही सुरू आहे, ज्याची तयारी अनुराधा टिंबर इंटरनॅशनलने केली आहे. या दरवाजांवर सोन्याचं प्लेटींग करण्यात आलं आहे.
अनुराधा टिंबर इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय मॅनेजिंग डायरेक्टर सरथ बाबू म्हणाले की, त्यांना राम मंदिराचे दरवाजे बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सरथ बाबूंनी दरवाजे बनवले ज्यावर सोन्याचं प्लेटींग दुसऱ्या कंपनीने केलं आहे.
सरथ बाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, "3 वर्षांपूर्वी चंपक राय यांनी त्यांना एक मॉडल बनवण्यास सांगितलं होतं. तेव्हा मंदिरात सध्या बसवलेल्या दरवाज्यासारखे मॉडल बनवलं होतं आणि ते रामनवमीच्या वेळी अयोध्येत आणलं होतं."
"गेल्या वर्षी जूनमध्ये अनेक मुलाखतीनंतर आम्हाला शॉर्टलिस्ट करण्यात आलं, तेव्हापासून आम्ही दरवाजे बनवण्याचं काम सुरू केलं. गर्भगृह, मंडप आणि सिंहासह 14 दरवाजे गोल्ड कोटेड आहेत. तिजोरीसाठी स्वतंत्रपणे चार दरवाजे बनवण्यात आले आहेत. कंपनीने राम मंदिराचे एकूण 18 दरवाजे बनवले आहेत."
"मंदिराचा वरचा भाग बांधला जाईल, तेव्हा त्याच्या दरवाजाचे कामही आम्हाला मिळेल, दारांसाठी सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे. दरवाजांना 1000 वर्षे काहीही होणार नाही, कोरीव काम आणि नक्षीकाम अतिशय तपशीलवारपणे केले गेले आहे."
"गर्भगृहात बसवलेला दरवाजा 12 फूट रुंद आणि 9 फूट लांब आहे. दरवाजाची जाडी 5 इंच आहे. इतर सर्व दरवाजे 9 ते 10 फूट वेगवेगळ्या उंचीचे आणि 5 इंच जाडीचे आहेत. दरवाज्यांवर संपूर्ण नक्षीकाम आम्ही केले असून डिझाइन सोनपूर येथून घेतले. गर्भगृहाच्या दरवाजाची रचना वेगळी आणि इतर दरवाजांची रचना वेगळी आहे."
"दरवाजावर गजराज कोरलेले आहेत. त्यात कमळ आणि देवांच्या मूर्तीही आहेत. हे सर्व आम्ही हाताने कोरलं आहे. बाहेरील दरवाजांवर स्वस्तिक आणि आतील बाजूस अप्रतिम गजराज आणि देवांच्या मूर्ती आहेत" असं ही सरथ बाबू यांनी म्हटलं आहे.