मुंबई - भाजपाने जरी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले असले तरी पंतप्रधान पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि भाजपाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यातच ब्लॅक शेड्स चित्रपटांचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने मोदींपेक्षा नितीन गडकरीच पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नितीन गडकरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास एनडीएतील महाआघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जाऊ शकतो. मात्र, हा उमेदवार कोण असेल ? भाजपाकडून मोदींना डावलून काही भाजपा नेत्यांची नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये नितीन गडकरी, सुषमा स्वराज आणि इतर दिग्गज नेत्यांची नावं पुढे येत आहेत. मात्र, कॉन्ट्रावर्सी किंग आणि हटके चित्रपटाच्या माध्यमातून वेगळा दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अनुराग कश्यपने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींऐवजी नितीन गडकरींना पसंती दिली आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त नितीन गडकरी हेदेखील पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती आहेत. खरं तर साऱ्याच पक्षांमध्ये भ्रष्टाचार पाचवीला पूजलेला आहे. मात्र, आता या भ्रष्टाचाराचं स्वरुप बदललं आहे. सध्याच्या काळात तर भ्रष्टाचार म्हणजे काहींसाठी आदर्शचं झाला आहे. या भ्रष्टाचाराला तुम्ही किंवा आम्ही आळा घालू शकत नाही. देशातील राजकारणातून भ्रष्टाचाराचा नायनाट करणं शक्य नसलं तरी सांप्रदायिकता, द्वेष आणि भीतीचं राजकारण हे नक्कीच नष्ट होऊ शकतं', असे अनुरागने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. मोदींना पाठिंबा देणारा एक मेसेज अनुरागला व्हॉट्स अॅपवर आला होता. त्यामुळे हा मेसेज पाहिल्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून मोदींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांनी यापूर्वीही अनेकदा मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे. तसेच भाजपाचे किंवा एनडीएचे सरकार सत्तेत आल्यास मोदी हेच पंतप्रधान होतील, असेही गडकरी यानी स्पष्ट केलं आहे.