ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान दौ-याबाबत माफी मागावी असं ट्वीट करणारा चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने आपल्या विधानावरून पलटी मारली आहे. मोदींनी माफी मागावी अशी मागणी केली नसल्याचं स्पष्टीकरण त्याने फेसबुकवरुन दिलं आहे.
'मोदींकडे माफी मागितली नसल्याचे सांगण्यासाठी मला स्पष्टीकरण द्यावे लागते, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. मला मिडीयासोबत बोलायचं नाही, त्यामुळे मी फेसबुकवर पोस्ट करत आहे. चित्रपट उद्योगाला सहजतेने लक्ष्य केलं जातं. मी परिस्थितीबाबत काहीही प्रश्न उपस्थित केले नाही. मोदी पाकिस्तान दौ-यावर गेले तेव्हा भविष्यातील स्थितीबाबत अनभिज्ञ होते, मात्र माझ्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्या्त आला. मला चांगलं माहित आहे की सरकार कधी कोणत्या चित्रपटावर बंदी घालत नाही किंवा पाकिस्तानी कलाकारांना परत पाठवण्याची भाषा बोलत नाही. पंतप्रधानांनी कधी माझा कोणता चित्रपट सेन्सॉर नाही केला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी मी पंतप्रधानांना केवळ प्रश्न विचारला होता, काही लोक परिस्थितीचा गैरफायदा उठवत आहेत आणि त्याची किंमत बॉलिवूडला मोजावी लागते . ज्यांना कोणाला देश प्रेम दाखवायचे आहे त्यांनी सीमेवर जाऊन देशप्रेम व्यक्त करावे'. अशी पोस्ट अनुरागने केली आहे.
याआधी अनुरागने पाकिस्तानला भेट देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांची माफी मागावी, असं ट्विट केलं होतं. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी मागायला हवी. कारण यादरम्यानच दिग्दर्शक-निर्माता करण जोहर 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाची शूटिंग करत होता", असं ट्वीट कश्यपनं केलं होतं. त्याच्या या वादग्रस्तनंतर नेटिझन्स अक्षरशः संतापले होते,आणि कश्यपवर चांगलीच आगपाखड होत होती.