नवी दिल्ली - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचं प्रमोशन झालं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनुराग ठाकूर हे 2016 मध्ये प्रादेशिक सैन्याशी जोडले गेले आहेत. प्रादेशिक सैन्यातील म्हणजेच Territorial Army मध्ये आता त्यांचं प्रमोशन झालं आहे. ते आधी लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाले होते. आता त्यांची बढती करण्यात आली असून त्यांना कॅप्टन पद देण्यात आलं आहे. ठाकूर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे
"जुलै 2016 मध्ये मी टेरिटोरियल आर्मीमध्ये रेग्युलर ऑफिसरप्रमाणे लेफ्टनंट पदावर नियुक्त झालो होतो. आज मला सांगताना अभिमान वाटत आहे की, माझं प्रमोशन झालं असून मी कॅप्टन बनलो आहे. भारत माता आणि तिरंग्याप्रति असलेलं कर्तव्य पार पाडण्यासाठी मी तयार आहे. जय हिंद" अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय?
टेरिटोरियल आर्मी हा भारतीय सैन्याचा एक भाग आहे. लष्कराला जिथेही गरज भासते तिथे टेरिटोरियल आर्मी आपलं यूनिट उपलब्ध करुन देते. टेरिटोरियल आर्मीमध्ये 18 ते 42 वर्यापर्यंतचे, पदवीचं शिक्षण घेतलेले, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेले नागरिक लेफ्टनंट पदावर रुजू होऊ शकतात. या आर्मीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे कमाईचं स्वत:चं साधन असलं पाहिजे. ही एक प्रकारे वॉलेंटियर सर्व्हिस आहे, कायमस्वरुपाची नोकरी नाही.
क्रिेकेटर महेंद्रसिंग धोनीही टेरिटोरियल आर्मीसोबत जोडला गेलेला आहे. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ऑपरेशन रक्षक, नॉर्थ-ईस्टमध्ये ऑपरेशन रायनो आणि ऑपरेशन बजरंगमध्ये टेरिटोरियल आर्मीने सक्रियपणे भाग घेतला होता. टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार आणि सर्व्हिस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.