केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. पाकिस्तानात नाही, तर भारतात निवडणुका होत असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं (काँग्रेस) पाकिस्तानवर प्रेम आहे, भारतावर नाही असं म्हणत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले की, "काँग्रेसने देशाच्या एका भागाला पीओके बनवलं आहे. "काँग्रेसचं पाकिस्तानबद्दलचं प्रेम पाहून हेच दिसून येतं की, त्यांचे नेते भारतात राहतात पण पाकिस्तानचं गुणगाण गातात. काँग्रेसची विचारसरणी पाकिस्तान समर्थक आहे. भारताच्या एका भागाला पाकव्याप्त काश्मीर बनवलं आहे."
हिमाचल प्रदेशमध्ये अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस पाकिस्तानचं गुणगान का गात आहे? असा प्रश्न विचारला आहे. तसेच यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. काँग्रेसचं भारतातील जनतेवर प्रेम नाही असं म्हटलं आहे. पुन्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील, असा दावा देखील अनुराग यांनी केला.
"गेल्या दहा वर्षांत हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर लोकसभा मतदारसंघात शैक्षणिक क्रांती झाली आहे. आम्ही सातत्याने विकासकामं करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांच्या हिताचा विचार करतात, पण काँग्रेस फक्त स्वतःचा विचार करते" असंही ते म्हणाले.
अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसने सतपालसिंग रायजादा यांना उमेदवारी दिली आहे. राज्यातील शिमला, हमीरपूर, मंडी आणि कांगडा या चार जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे.