नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पाही गदारोळात सुरू झाला. सोमवारी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील भाषणावरुन सत्ताधाऱ्यांनी तर अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर जेपीसीच्या मागणीवरुन मंगळवारी विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी राहुल गांधींवर निशाणा साधला. ठाकूर म्हणाले- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लोकसभेतील उपस्थिती इतर खासदारांच्या सरासरी उपस्थितीपेक्षाही कमी आहे आणि ते परदेशात जाऊन बोलू दिले जात नसल्याचे सांगतात. आज भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि G20 चे अध्यक्षपद भूषवत आहे. या सर्व गोष्टी भारताची प्रगती दर्शवतात, पण दुसरीकडे राहुल गांधी भारताचा अवमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. हा देशाचा अपमान आहे. त्यांनी संसदेत येऊन माफी मागावी,' असे ते म्हणाले.
'राहुलने नाही, सरकारने माफी मागावी'यानंतर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर टीका केली. सरकारला संसद चालवायची नाहीये. सत्ताधारी पक्षाचे सर्व सदस्य संसदेचे कामकाज रोखण्यासाठी गदारोळ करतात. राहुल गांधींनी माफी का मागावी? त्याऐवजी त्यांनी (केंद्राने) च माफी मागावी,' असे ते म्हणाले. तर, 'सरकार अदानी प्रकरणाच्या तपासापासून पळ काढत आहे. आमचे ऐकले जात नाही,' असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?राहुल गांधी या महिन्याच्या सुरुवातीला लंडन दौऱ्यावर होते. येथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात बोलताना म्हटले की, 'भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत आम्हाला बोलू दिले जात नाही, आमचे माईक बंद केले जातात. माझ्यासोबत अनेकहा असे घडले आहे. नोटाबंदी हा भारतातील एक विनाशकारी आर्थिक निर्णय होता, परंतु आम्हाला त्यावर चर्चा करण्याची परवानगीही नाही. चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याच्या मुद्द्यावरही आम्हाला चर्चा करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत आम्हाला गुदमरल्यासारखे वाटते,' असं राहुल म्हणाले होते.