लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशहिताविरुद्ध काम करणाऱ्या यू-ट्युब चॅनल्सविरुद्ध २०२१-२२ दरम्यान कठोर कारवाई करण्यात आली असून, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने ९४ यू-ट्युब चॅनल्स, १९ सोशल मीडिया अकाऊंट्स आणि ७४७ वेबसाइट्स बंद केल्या आहेत. ही कारवाई माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील (२०००) कलम ६९-ए अन्वये करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. इंटरनेटवर खोट्या बातम्या प्रसारित करून आणि अपप्रचार करून देशाच्या सार्वभौमत्त्वाविरुद्ध काम करणाऱ्या संस्थांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाचा वापर देशविरोधी कृत्यासाठी करण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला.
या संदर्भात राजदचे सदस्य मनोजकुमार झा यांनी प्रश्न विचारला होता. केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले, काहीजण सोशल मीडियाच्या नावावर देशविरोधी कृत्य करीत आहेत. सभागृहातील काही लोकसुद्धा या लोकांचे समर्थन करतात. सोशल मीडियाच्या अभिव्यक्तीवर बंधन नसून केवळ देशविरोधी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. निरपराध व्यक्तींवर कारवाई होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.