नवी दिल्ली - अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर काँग्रेस नेत्यांच्या अनेक बैठका पार पडल्या. काँग्रेसमधील नाराज गटाच्याही बैठका झाल्या. निवडणुकीतील पराभवावर काथ्याकूट करण्यात आला. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी संसदीय दलाच्या सभेत बोलताना काँग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत भाष्य केले. पक्षात एकजुट हवी. काँग्रेसचे पुनरुज्जीवन लोकशाही आणि समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी बोलताना केले. याच दरम्यान आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसच्या झालेल्या पराभवावरून ठाकूर यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस गांधी परिवाराच्या पलीकडे पाहतच नाही, अशा शब्दात अनुराग ठाकूर यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच "काँग्रेस पक्ष गांधी परिवाराच्या बाहेर पाहतच नाही. राहुल गांधींनी पदभार स्विकारला पण पश्चिम बंगालमध्ये एकही जागा जिंकू शकले नाहीत. प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेशातील मोहीम हाती घेतली पण फक्त दोन जागा जिंकल्या आणि डिपॉझिटही जप्त झालं. आता पुन्हा सोनिया गांधींनी पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली आहे."
"काँग्रेसमध्ये काय घडतंय आणि ते फक्त गांधी परिवारापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत का हे प्रश्न अनेक वर्षांपासून अनुत्तरितच आहेत. काँग्रेसला त्यांची हीच कोडी उलगडलेली नाहीत" असं देखील अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोनिया गांधी पुढे बोलताना म्हणाल्या की, पुढचा मार्ग आणखी कठीण आहे. पक्षाची निष्ठा, इच्छाशक्ती आणि प्रतिकाराची क्षमता पणाला लागणार आहे, असे सांगत काँग्रेसमधील असंतुष्ट जी-२३ नेत्यांच्या टीकेला कोणतेही उत्तर न देता सोनिया गांधींनी आपण आपल्या पक्षाची एकता टिकवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे नमूद केले.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांनंतर तुम्ही सगळे नाराज आहात हे जाणते. हे निकाल धक्कादायक आणि दुःखदायक होते. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीला भेटून कामकाजाचा आढावा घेतला. अन्य सहकाऱ्यांनाही भेटले. आपला पक्ष आणखी मजबूत कसा करायचा याबद्दल मला अनेक सूचनाही आल्या आहे. त्यापैकी अनेक सूचना या समर्पक आहेत आणि मी त्यावर काम करत आहे. चिंतन शिबिर घेणेही महत्त्वाचे आहे. कारण त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर सहकाऱ्यांच्या आणि पक्षाच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेता येतात, त्यांचे विचार समजावून घेता येतात. आपल्या पुढे येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीचा मार्ग आणि त्यावर लगेच करायची कार्यवाही याबद्दल या सहकारी सांगतात, असेही त्या म्हणाल्या.