VIDEO: "राहुल जी शून्य तपासून घ्या"; भाजप खासदाराने वाचून दाखवला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:08 IST2025-02-10T21:04:04+5:302025-02-10T21:08:18+5:30
माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

VIDEO: "राहुल जी शून्य तपासून घ्या"; भाजप खासदाराने वाचून दाखवला काँग्रेसच्या अपयशाचा पाढा
Anurag Thakur On Rahul Gandhi: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी हे भाजपच्या निशाण्यावर आहेत. संसदेतही अर्थसंकल्पीय अधिवेशनावरील चर्चेदरम्यानही भाजप खासदारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. माजी मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी यांचा उल्लेख करत अनुराग ठाकूर यांनी एक पोस्टर दाखवलं. पोस्टर दाखवत अनुराग ठाकूर यांनी राहुलजींनी शून्य तपासावे, असं म्हटलं. यावेळी अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचाही उल्लेख केला. अनुराग ठाकूर यांच्या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे हिमाचल प्रदेशचे खासदार अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सरकारच्या कामगिरीची लेखाजोगा मांडत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जेव्हा पंतप्रधान मोदींनी मध्यमवर्गीयांना दिलासा दिला, तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखू लागले. त्यांना वाटले की आता आपली मते हिसकावून घेतली जातील, असं अनुराग ठाकूर म्हणाले. त्यानंतर ठाकूर यांनी एक पोस्टर काढले. त्यावर १२००००० रुपये करमुक्त असल्याचा उल्लेख होता. अनुराग ठाकूर यांनी हे दाखवून राहुल जी शून्य तपासून घ्या, असं म्हटलं. यावर भाजपचे सर्व खासदार जोरात हसले.
यानंतर या शून्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी बोलण्याचा प्रयत्न करता अनुराग ठाकूर यांनी. तुम्हाला हे आवडत नसेल तर आम्ही सोडून देतो. मात्र हे कोट्यवधी मध्यमवर्गीयांना आनंद देणारे आहे. देशाच्या विकासात हातभार लावणार आहे. पण अजून एक शून्य आहे, असं म्हटलं.
यानंतर अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. "२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या, भाजप खासदार म्हणाले शून्य. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने काँग्रेसला किती जागा दिल्या शून्य. २०२४ च्या लोकसभेत किती जागा दिल्या तर शून्य आणि आता २०२५ च्या विधानसभेत किती जागा दिल्या शून्य. विक्रमी शून्य मिळण्याचे काम जर कोणी केले असेल तर तो राहुल गांधींचा पक्ष काँग्रेस आहे," असं अनुराग ठाकूर म्हणाले.
राहुल जी, ज़ीरो चेक कर लीजिए 👉🏻 0️⃣ pic.twitter.com/0Sg9IEy09I
— Anurag Thakur (@ianuragthakur) February 10, 2025
दरम्यान, यावेळी अनुराग ठाकूर यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षावरही निशाणा साधला. "दिल्ली निवडणुकीच्या निकालाने दिल्लीतील जनतेने दिल्ली आपत्तीमुक्त केल्याचे दिसून आले आहे. ही केवळ घोषणा नाही पंतप्रधान मोदी दिल्लीच्या हृदयात राहतात. दिल्लीतील जनतेला आपदाच्या लूटीतून मुक्तता मिळाली आहे. दिल्लीच्या जनतेने १० वर्षांच्या कुशासन आणि प्रदूषणातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला आहे," असं ठाकूर म्हणाले.