शेती करून लाखो रुपये कमावणाऱ्या तरुणीची प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. kisantak.in च्या रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे राहणारी अनुष्का जयस्वाल हिने दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे, मात्र इतरांप्रमाणे नोकरी करण्याऐवजी तिने शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज तिला वर्षाला 45 लाख रुपये मिळतात. अनुष्काने जेव्हा शेती करायला सुरुवात केली तेव्हा ती 23 वर्षांची होती आणि आता वयाच्या 27 व्या वर्षी ती दरमहा लाखो रुपये कमावते.
एका मुलाखतीत अनुष्काने सांगितलं की, 2021 मध्ये तिने लखनौच्या मोहनलालगंज भागातील सिसेंडी गावात एक एकर जमीन घेऊन शेती सुरू केली होती. तिने सांगितलें की तिला सरकारकडून शेतीसाठी 50 टक्के सब्सिडी मिळाली होती, त्यानंतर तिने एक एकर जमिनीवर पॉली हाऊस सुरू केलं आणि आज अनुष्का 6 एकर जमिनीवर भाजीपाल्याची लागवड करत आहे, ज्यामुळे तिला भरपूर नफा मिळतो.
अनुष्काने पुढे सांगितलं की, जेव्हा तिने काम करण्याऐवजी शेती करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते, परंतु सर्व अडचणी असूनही तिने कधीही हार मानली नाही आणि आज ती लाखो रुपये कमवत आहे.
सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या भाज्या
अनुष्का जयस्वालने सांगितलं की, तिच्या शेतातून पिकवलेल्या भाज्या लखनौच्या सर्व मार्केट आणि शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जातात, ज्यामुळे तिला चांगला नफा मिळत आहे. आपल्या कुटुंबाबद्दल ती म्हणाली की तिचे वडील व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे. भाऊ पायलट आहे, बहीण वकील आहे आणि वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.
शेतीचा अनुभव नव्हता, म्हणून शेतीचे प्रशिक्षण घेतले. मजुरांना तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रशिक्षण दिले. एक एकर जागेवर बांधलेल्या पॉली हाऊसमध्ये 50 टन काकडी आणि 35 टन पिवळ्या शिमला मिरचीचे उत्पादन घेतले आहे. लखनौच्या भाजी मार्केट आणि मॉल्समध्ये तिच्या शेतातून पिकवलेल्या भाज्यांना खूप मागणी आहे.
अनुष्का तिच्या शेतात कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरत नाही. ती सांगते की ती सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवते, जी पूर्णपणे रसायनमुक्त आहे. फलोत्पादन विभागाकडून ड्रॉप मोअर क्रॉप अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळाले असून त्यामुळे भाजीपाला लागवडीवर खर्च कमी आणि उत्पादन जास्त असल्याचं तिने सांगितलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.