तिरुवनंतपुरम - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या मंकीपॉक्स आजाराने भारतातही चिंता वाढवली आहे. मंकीपॉक्समुळे भारतात पहिला मृत्यू झाला असल्याच्या घटनेस आता दुजोरा मिळाला आहे. यूएईमधून केरळमध्ये परतलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू हा मंकीपॉक्समुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर तरुणाचा मृत्यू हा मंकीपॉक्समुळे झाला आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे पाठवण्यात आले होते. तिथे रिझल्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सदर तरुणाचा मृत्यू हा मंकीपॉक्समुळेच झाल्यावर शिक्तामोर्तब झाले.
मंकीपॉक्सबाबत वाढत्या चिंतेमुळे केंद्र सरकारही झटपट पावले उचलत आहे. मंकीपॉक्सला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत एक टास्क फोर्ससुद्धा तयार करण्यात आली आहे. या टास्क फोर्सचे नेतृत्व व्ही. के. पॉल आणि राजेश भूषण करत आहेत.
दरम्यान, जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा फैलाव झाला आहे. तसेच या आजाराचे गांभीर्य विचारात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.