नवी दिल्ली - पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. एअर स्ट्राइकचा पुरावा मागणारे देशविरोधी आणि पाकिस्तानचे समर्थक असल्याचं रुपानी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पुरावा मागणाऱ्या पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांनाही पाकिस्तानी समर्थक म्हटलं आहे.
गांधीनगर येथील पक्ष कार्यालयात मंगळवारी (9 एप्रिल ) गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. 'मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यावेळी निवडणूक भारत आणि पाकिस्तान यांच्यात आहे. कारण पाकिस्तान भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा पुरावा मागत आहे आणि काँग्रेसही तीच भाषा बोलत आहे' असं रुपानी यांनी म्हटलं. 'ज्या लोकांना आपल्या जवानांनी केलेल्या कारवाईवर शंका आहे, ते एकाप्रकारे पाकिस्तानला मदत करत आहेत' असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीयही पुरावा मागत असल्याचं विचारलं असता त्यांनी 'जो कोणी आपल्या सैन्यावर शंका घेईल, त्याला पाकिस्तानी म्हटलं जाईल' असं सांगितलं. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विजय रुपानी यांनी भाजपाच्या संकल्पपत्रावर बोलताना 'ही नवा भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा आहे. भारताने गेल्या पाच वर्षात खूप प्रगती केल्याचं जगाने मान्य केलं आहे. गेल्या 60 महिन्यांत मोदी सरकारने थेट भ्रष्टाचाराशी लढा दिला. देशाची सुरक्षा आमच्या सरकारची पहिली प्राथमिकता आहे. दहशतवाद्यांशी लढा देण्यासाठी सरकारने सैन्याला सूट दिली आहे. कारण दहशतवादाशी लढा देताना कोणतीही तडजोड सरकारला मान्य नाही' असं सांगितलं आहे.
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती.
अमेरिकेप्रमाणे एअर स्ट्राइकचे पुरावे जगासमोर ठेवायला हवेत - दिग्विजय सिंह
अमेरिकेने ज्या प्रकारे ओसामा बिन लादेनवर केलेल्या कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे, असे दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. दिग्विजय सिंह यांनी 'भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईवर मी प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, या भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईचे सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो मिळणे शक्य आहे. ज्याप्रकारे अमेरिकेने ओसामा कारवाईचे सबळ पुरावे जगासमोर ठेवले. तसेच, सरकारनेही आपल्या भारतीय हवाई दलाने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत करायला हवे' असं म्हटलं होतं.