नवी दिल्ली- तुमच्याकडे एक कोटी ते सव्वा कोटी रुपये आहेत का? मग तुम्हाला एका देशाचे नागरिकत्त्व सहज मिळू शकते. कॅरेबियन बेटांमधील अनेक लहानहान देश भारतातून पळून आलेल्या गुन्हेगारांना पैशाच्या मोबदल्यामध्ये नागरिकत्त्व देत आहेत. यामध्ये अँटिग्वाचे स्थान एकदम वर आहे. पीएनबी घोटाळ्याचा आरोप असणारा मेहुल चोक्सी अँटिग्वाला गेला आहे, अशी माहिती उघड झाली आहे. केवळ 1.3 कोटी रुपयांमध्ये त्याला अँटिग्वा नागरिकत्व व दुसरा पासपोर्ट देऊ शकेल.अँटिग्वा आणि बार्बाडोस नागरिकत्वासाठी गंतवणूक योजना 2012 साली जाहीर झाली. यानुसार ज्या व्यक्तीला त्या देशाचे नागरिकत्व आहे ते काही रक्कम रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवू शकतात किंवा निधी देऊ शकतात. त्यासाठी पर्याय देण्यात आले आहेत. अँटिग्वा विकास निधीला 2 लाख डॉलर्स देणे, तेथील रिअल इस्टेटमध्ये 4 लाख डॉलर्स गुंतवणे किंवा तेथील व्यवसायात 15 लाख डॉलर्स गुंतवणे असे कोणेही पर्याय वापरता येऊ शकतात. मेहुल चोक्सीच्या आर्थिक ताकदीच्या मानाने हे सर्व आकडे किरकोळ म्हणावे लागतील. या पासपोर्टबरोबर 132 देशांमध्ये व्हीसाविना प्रवास करण्याची सुविधाही त्याला मिळणार आहे. असे असले तरी अँटिग्वाच्या नागरिकत्वासंबंधी संकेतस्तळावर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना नागरिकत्व मिळणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. मात्र आजवर अनेक घोटाळेबाजांनी अशा प्रकारचे मार्ग वापरुन लहान देशांमध्ये नागरिकत्व मिळवून चैनीत जगण्याचा मार्ग अवलबंला आहे. पीएनबी घोटाळ्यात बँकेची व पर्यायाने भारत देशाची फसवणूक करणाऱ्या मेहुलला अँटिग्वासारखे देश स्वर्गच आहेत.सेंट किट्स आणि नेवीसचा पायपोर्टही सहज मिळू शकतो. 1.3 कोटी रुपये दिले की या देशाचा पासपोर्ट केवळ चार महिन्यांमध्ये हातात पडतो. हे पैसे सेंट किट्स शाश्वत विकास निधीमध्ये द्यायचे किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवायचे की पासपोर्ट मिळतो. तसेच यामुळे जगभरातील 141 देशांमध्ये व्हीसाविना जाताही येतं. यामध्ये भारत आणि इंग्लंड देशांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर डॉमिनिका रिपब्लिकमध्ये 68 लाख रुपयांचा निधी दिला की तुम्ही प्रत्यक्षात तेथे न जाता पासपोर्ट मिळतो. त्याबरोबर तुम्हाला जगातील 115 देशांमध्ये व्हीसाविना फिरता येऊ शकतं. त्यामध्ये युरोपियन युनीयमधील देश, हाँगकाँग, सिंगापूर, स्वित्झर्लंड या देशांचा समावेश आहे.