कोरोना विषाणूशी लढणारं औषध शोधण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू असतानाच, योगगुरू बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' समूहाने कोविड-19 आजारावर 'कोरोनिल' या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली. अश्वगंधा, गुळवेल, श्वासारी, तुळशी अशा वनौषधींपासून तयार करण्यात आलेलं औषध कोरोनारुग्णांना ठणठणीत बरं करू शकतं, त्याची यशस्वी चाचणीही आपण घेतलीय, असा बाबा रामदेव यांचा दावा आहे. मात्र, लाँचिंगपासूनच 'कोरोनिल' वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. महाराष्ट्राने ‘कोरोनिल’च्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहेच, पण राजस्थाननेही या औषधाच्या विक्रीबाबत कडक इशारा दिला आहे.
बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाची घोषणा केल्यानंतर लगेचच, या औषधाची सविस्तर माहिती पाठवा आणि त्याची जाहिरात करणं त्वरित थांबवा, असे आदेश केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिले. त्यामुळे या औषधाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. आयुष मंत्रालय, आयसीएमआर यांची परवानगी नसलेलं पतंजलीचं औषध कितपत विश्वासार्ह आहे, त्याच्या योग्य चाचण्या झाल्यात का, अशी शंका निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवरच, रामदेव बाबांच्या औषधावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच ते घ्यावं, अशी सूचक प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानंतर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या औषधाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘‘कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत काही माहिती उपलब्ध नाहीय. जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास करत आहे. यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही’’, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलंय. तशाच प्रकारची भूमिका राजस्थान सरकारनेही घेतली आहे.
बाबा रामदेव यांनी आपल्या औषधाची वैद्यकीय चाचणी करण्यासंदर्भात कुठलीही परवानगी राज्य सरकारकडे मागितली नव्हती. मानवी चाचण्या करण्यासाठी अशी परवानगी घेणं बंधनकारक असतं. परवानगीविना चाचणी केल्यास ती जनतेची दिशाभूल मानली जाते आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाते, अशी रोखठोक भूमिका राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी मांडली. पतंजलीच्या कोरोनिल औषधाची विक्री करताना कुणी आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. आयुष मंत्रालय आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच राजस्थानमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहे. आयुर्वेदिक औषधं रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. पण या औषधांमुळे रुग्ण बरे होतात, हा दावा आयुष मंत्रालयाच्या मान्यतेशिवाय करणं स्वीकारार्ह नाही, असंही शर्मा यांनी नमूद केलं.
रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल
बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, परवानगीशिवाय औषधाची चाचणी घेतल्याने होणार कायदेशीर कारवाई
"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'