नवी दिल्ली, दि. 25 - समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष आणि संरक्षक मुलायम सिंह यादव यांनी नवा पक्ष काढण्याच्या वृत्ताला पूर्णविराम दिलं आहे. पत्रकार परिषद घेऊन मुलायम सिंह यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली आहे. जो बापाचा झाला नाही, तो जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही, असंही मुलायम सिंह यादव म्हणाले आहेत. अखिलेश माझे पुत्र आहेत. माझा त्यांना आशीर्वाद आहे. मात्र त्यांच्या निर्णयाशी मी सहमत नाही. राम मनोहर लोहिया ट्रस्टमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे.ते म्हणाले, पेट्रोलवरही जीएसटी लावलं पाहिजे होतं. नोटाबंदीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. बीएचयूमध्ये विद्यार्थिनींसोबत छेडछाडही होतेय. माझ्या कार्यकाळात जनतेसाठी पुरेशी वीज उपलब्ध होती. मात्र आता अनेक ठिकाणी वीज नाही. शेतक-यांचं एक लाखापर्यंतच कर्ज माफ केलं पाहिजे होतं. कर्जमाफीवरून शेतक-यांशी खेळलं जातंय. तसेच शिक्षण विभागावरही अन्याय होतोय. जनतेला मोफत औषधं, शिक्षण, सिंचन मिळालं पाहिजे. तरुणांना अजूनही रोजगार मिळत नाही. तसेच समाजवादी विचारधारेच्या व्यक्तींनी समाजवादी पक्षात सामील व्हावं. समाजवादी पक्ष गाव, गल्लीबोळ्यात सगळीकडे पसरला आहे.अखिलेशनं माझ्याकडे तीन महिन्यांचा वेळ मागितला होता. त्यानंतर मला अध्यक्ष करतो, असंही तो म्हणाला होता. मात्र तो त्याच्या विधानावर ठाम राहिला नाही. बापाला धोका देणारी अशी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जो बापाचा नाही तो कोणाचाच नाही, असं देशातील मोठ्या जाणकार व्यक्तींनी सांगितलं आहे. तसेच मी कोणताही नवा पक्ष स्थापन करत नाहीये, असंही मुलायम सिंह यादवांनी स्पष्ट केलं आहे. अखिलेश आणि शिवपाल दोघेही समाजवादी पार्टीसोबत आहेत. मात्र समाजवादी पार्टीच्या राज्य संमेलनात अखिलेशनं शिवपालला आस्तिनचा साप असंही संबोधलं होतं. आम्ही समाजवादी पार्टीसोबत आहोत. मात्र आग्रा येथे होणा-या समाजवादी पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात मी सहभागी होणार नाही. वर्ष उलटून गेलं तरी समाजवादी पार्टीतील अंतर्गत मतभेद संपण्याचं काही नाव घेत नाहीयेत.
जो बापाचा नाही झाला, तो जीवनात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही- मुलायम सिंह यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 5:52 PM