कोलकाता: पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर आता भाजपानं ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित केली आहे. विधानसभेच्या तीन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव राहुल सिन्हा यांनी ईव्हीएमबद्दल प्रश्न उपस्थित केले. राज्य सरकारच्या यंत्रणेनं तृणमूल काँग्रेसला उघडपणे मदत केली. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचंदेखील सिन्हा म्हणाले.निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवलं जातं. मात्र पोटनिवडणुकीच्या कामावर राज्य सरकारच्या प्रशासनाचं लक्ष असतं. तृणमूल काँग्रेस पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकतो, असं सिन्हा यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितले. सिन्हा यांनी ईव्हीएमबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ईव्हीएमसोबत काहीही केलं जाऊ शकतं. ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही. सत्ताधारी पक्षाकडून मतमोजणीवेळी घोटाळा केला जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. आपल्या दाव्याचं समर्थन करताना सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. 'लोकसभा निवडणुकीवेळी भाजपानं कालियागंज आणि खरगपूर विधानसभा मतदारसंघात मोठा विजय मिळवला होता. कालियागंज आणि करीमपूरमध्ये भाजपाला २०१६ च्या तुलनेत जास्त मतं मिळाली होती. मग आम्ही सर्व मतदारसंघात कसे काय पराभूत होऊ शकतो? तृणमूलनं पहिल्यांदाच खरगपूर मतदारसंघात विजय मिळवला आहे. त्यामुळे शंका घेण्यास वाव आहे,' असे सिन्हा म्हणाले. कालियागंज विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तपन देब सिन्हा यांनी निकटचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे उमेदवार कमलचंद्र सरकार यांचा २४१८ मतांनी पराभव केला. खरगपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार प्रदीप सरकार यांनी भाजपच्या प्रेमचंद झा यांचा २०,८११ मतांनी, तर करीमपूर विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या बिमलेंदू सिन्हा रॉय यांनी भाजपच्या जयप्रकाश मजुमदार यांचा २३,६५० मतांनी पराभव केला.
पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत धक्का; भाजपा नेत्याला ईव्हीएमवर शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 11:24 AM