रांची - कोरोना महामारीचा फटका शैक्षणिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसला असून विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नसल्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे जेईई परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या सावटाखाली विद्यार्थ्यांना भीतीच्या वातावरणात परीक्षा द्यावी लागत आहे. रांचीतील एका शेतकऱ्याच्या मुलीने तब्बल 300 किमीचा प्रवास करुन जेईई परीक्षा दिली.
नालंदा ते रांची असा 300 किमीचा प्रवास आपल्या वडिलांच्या दुचाकी वाहनावरुन केल्यानंतर एका विद्यार्थीनीने परीक्षा केंद्र गाठले. बिहारच्या नालंदा येथील रहिवासी असलेल्या धनंजय कुमार यांनी तब्बल 12 तास दुचाकी चालवून आपल्या लेकीला जेईई परीक्षेसाठी रांचीला पोहोचवले. सध्या कोरोना महामारीमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा अद्यापही सुरळीत झाली नाही. त्यातच, बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांतील नागरिकांच्या प्रवासासाठी बससेवा सुरू नसल्याने वाहतूकीची मोठी समस्या आहे. त्यामुळे, धनंजय कुमार यांनी नालंदा जिल्ह्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. आठ तासाच्या प्रवासानंतर ते बोकारो येथे पोहोचले होते. त्यानंतर, आणखी 135 किमीचा दुचाकी प्रवास करत ते सोमवारी दुपारी रांचीला पोहोचले. रांची येथे त्यांच्या मुलीचे जईई परीक्षा केंद्र होते.
नालंदा ते रांची प्रवासासाठी सध्या मोटारसायकल हाच पर्याय आहे. कोरोना व्हायरसमुळे बससेवा सुरू नाही व चारचाकी खासगी वाहनांचे भाडे परवणारे नसल्यामुळे मी मुलीला दुचाकीवरुन 300 किमी प्रवास केल्याचे धनंजयकुमार यांनी सांगितले. बोकारो ते रांची जात असताना मला झोप येऊ लागली. त्यामुळे, काही वेळ झोप घेऊन मी पुढील प्रवास केला. दरम्यान, झारखंडच्या 10 केंद्रांवर जवळपास 22,843 विद्यार्थी परीक्षेत सहभागी आहेत.
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना संधी? पूरग्रस्त भागात असलेल्या ज्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा होऊ शकणार नाही त्या केंद्रावरील विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून एक संधी देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, जे परीक्षार्थी परीक्षा न देता काही बहाणा देत असतील अशांना संधी मिळणार नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक डॉ. विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, जेईई मुख्य परीक्षेवर सध्या लक्ष केंद्रीत केलेले आहे. या परीक्षेला ९.५३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी ही परीक्षा ८ टप्प्यात झाली होती. यंदा ती दोन सत्रात सलग सहा दिवस म्हणजे १२ टप्प्यात होणार आहे.