नवी दिल्ली : पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून अनेक वर्षांपासून रखडलेला नद्या जोड प्रकल्प पुढे रेटण्याचा मनोदय केंद्र सरकारने व्यक्त केला आहे़ नद्या जोड प्रकल्प कुठल्याही स्थितीत राबवला जाईल आणि या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर तोडगा शोधला जाईल़ प्रसंगी त्याला डावलून हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असा ठाम निर्धार केंद्र सरकारने मंगळवारी बोलून दाखवला़गेल्या अनेक वर्षांपासून नद्या जोड प्रकल्प रखडलेला आहे़ नद्या जोडणीमुळे सागरी जीवन धोक्यात येईल़ जैवविविधता आणि परिसंस्थेलाही यामुळे धोका उद्भवेल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे़ त्यामुळे या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी विरोध चालवला आहे़ या पार्श्वभूमीवर नगरविकासमंत्री एम़ वेंकय्या नायडू यांनी ‘भारत जल सप्ताह’प्रसंगी बोलताना नद्या जोड प्रकल्पाच्या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली़ आमचे काही पर्यावरणवादी मित्र नद्या जोड प्रकल्पाबाबत चिंतित आहेत़ लोकशाहीत आवाज उठवण्याचा अधिकार आहे़ तो उठत असेल तर उठू द्या;मात्र त्याचे उत्तरही आहे़ आम्ही प्राधान्यक्रमाने नद्या जोड प्रकल्प राबवणार, मग काहीही होवो, असे नायडू यावेळी म्हणाले़ या प्रकल्पाच्या मार्गात कुठलीही बाधा येवो, तिच्यावर तोडगा काढला जाईल वा तिला मार्गातून हटविले जाईल़ विकसित देश आपल्याला ‘शिकवत’ आहेत़ आता आपल्यालाही विकसित व्हावे लागेल़, असेही त्यांनी स्पष्ट केले़ यावेळी पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जल सुरक्षेसाठी ठोस जल व्यवस्थापनेवर भर दिला़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
काहीही होवो, नद्या जोड प्रकल्प राबवणारच -केंद्र
By admin | Published: January 14, 2015 12:31 AM