ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 6 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अपेक्षेप्रमाणे समाजवादी पक्षामध्ये यादवीचा दुसरा अंक सुरु झाला आहे. आता या वादात अपर्णा यादव यांनी उडी घेतली आहे. अखिलेशने आता पक्षाची सूत्रे आपल्या वडिलाकंडे म्हणजेच मुलायमसिंह यादवांकडे सोपवावीत अशी मागणी अपर्णा यादव यांनी केली आहे. अपर्णा यादव अखिलेशचा सावत्र भाऊ प्रतीक यादवच्या पत्नी आहेत.
अखिलेश यादव यांनी जानेवारी महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सपाचे अध्यक्षपद पुन्हा नेताजींकडे देण्याचे आश्वासन दिले होते. अखिलेश दिलेला शब्द पाळतात. त्यानुसार त्यांनी सपाचे अध्यक्षपद पुन्हा नेताजींना द्यावे असे अपर्णा यादव यांनी म्हटले आहे. जानेवारी महिन्यात सपामध्ये अंतर्गत यादवी तीव्र झाल्यानंतर अखिलेश यांनी पक्षावर नियंत्रण मिळवत अध्यक्षपद आपल्या हाती घेतले.
अखिलेशने वडिलांकडे तीन महिन्यांचा वेळ मागितला होता. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची सूत्रे पुन्हा मुलायम यांच्या हाती देऊ असे त्यांनी आश्वासन दिले होते. दरम्यान अपर्णा यांनी पक्षांतर्गत राजकारणातूनच माझा पराभव झाला असा आरोप केला आहे.
माझ्यासाठी माझे कुटुंब महत्वाचे आहे. नेताजींचा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे. ते जो पर्यंत आहेत तो पर्यंत मी दुसरा कुठलाही विचार करु शकत नाहीत. भविष्यात काय दडले आहे मला माहित नाही पण मला माझे कुटुंब एकत्र हवे आहे असे अपर्णा म्हणाल्या.
लखनऊ कँटॉंमेंटमधून मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. प्रचाराच्यावेळी वरिष्ठ नेत्यांनी दगा दिल्यामुळे पराभव झाला असे त्या म्हणाल्या. अहंकाराच्या लढाईमुळे पराभव झाला. मी हा विषय अखिलेशजी आणि नेताजींपर्यंत नेला पण अजूनपर्यंत काहीही झालेले नाही असे त्यांनी सांगितले. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. योगी चांगला सकारात्मक बदल घडवत आहेत. योगी उत्तरप्रदेशला आपले कुटुंब समजून विकास करतील असा विश्वास अपर्णा यांनी व्यक्त केला.