ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 4 - समाजवादी पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न करत असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना परिवारातील धाकटया सूनबाई अपर्णा यादव यांचा राजकीय प्रवेश खटकला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांच्या दुस-या पत्नी साधना यादव यांच्या सूनबाई आहेत.
साधना यांचा मुलगा प्रतीक यादव बरोबर अपर्णा यांचा विवाह झाला आहे. समाजवादी पक्षाने मागच्याचवर्षी लखनऊच्या कँटॉनमेंट विधानसभा मतदारसंघातून अपर्णा यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तिकीट वाटप, मर्जीतल्या व्यक्तींची पक्षातील महत्वाच्या पदांवर नियुक्ती अशा कारणांबरोबर अपर्णा यादव हे सुद्धा अखिलेश यांच्या नाराजीमागे एक कारण आहे.
साधना यादव कुटुंबातील सदस्यांच्या राजकीय प्रवेशाला अखिलेश यांचा तीव्र विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. साधन यादवमुळे आपल्या आईवर अन्याय झाल्याचीही अखिलेश यांची भावना आहे. सध्या अखिलेश यांच्याकडे मुलायमसिंह यादव यांचे वारसदार म्हणून पाहिले जाते.
अपर्णा यादव यांच्या राजकीय प्रवेशानंतर आणखी एक मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धक निर्माण होऊ शकतो त्यामुळे अखिलेश गटाचा अपर्णा यादव यांना विरोध आहे. अपर्णा यादव यांच्याकडे सध्या कुठलेही राजकीय पद नसले तरी त्या सामाजिक कार्यामध्ये सक्रीय आहेत.