लखनौ - आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा), राष्ट्रीय लोक दल (रालोद) हे तीन पक्ष आघाडी करण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचा समावेश करण्यास तीनही पक्ष फारसे उत्सुक नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.सपा व बसपाच्या नेत्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, आघाडीत काँग्रेसला सामावून घेण्याचा विचार नाहीच; पण अगदी नाइलाज झाला, तर जागा वाटपात या पक्षाला रायबरेली, अमेठी या दोन जागा देण्यात येतील. मायावती व अखिलेश यादव हे दोघे जागा वाटपाबद्दल अंतिम निर्णय घेतील.उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. सपा, बसपाने युती करायचे नक्की केले आहे; पण त्याबाबत अधिकृृत घोषणा लवकरच करण्यात येईल. सपा आपला मित्रपक्ष निषाद पार्टीला काही जागा देईल, तसेच रालोदला आघाडीत स्थान मिळेल.सूत्रांनी सांगितले की, मायावतींनी नुकतीच अखिलेश यादव यांची भेट घेऊन आघाडी व जागा वाटपाबाबत चर्चा केली. पर्यायी व्यूहरचना करायला भाजपाला जराही वेळ मिळू नये म्हणून सपा, बसपा व मित्रपक्षांच्या आघाडीची घोषणा ऐनवेळी करण्यात येणार आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये भारंभार मते मिळविण्याची शक्यता कमी आहे. या पक्षाला राज्यात अधिक वाव दिल्यास तेथील निवडणुकांना राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असा रंग येण्याची शक्यता आहे. नेमके हेच सपा, बसपाला नको आहे. (वृत्तसंस्था)२०१४ च्या सूत्रानुसार जागा वाटप?सपा, बसपाच्या आघाडीची घोषणा मायावती आपल्या वाढदिवशी, १५ जानेवारीला करतील अशी एक अटकळ आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपने ७१, तर सपाने ५ जागा जिंकल्या होत्या. बसपाला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता. या निवडणुकीत कोणी किती जागा लढविल्या त्यानुसार जागा वाटप व्हावे, असा मायावतींचा आग्रह आहे.
काँग्रेसला वगळून सपा-बसपा युती, रालोदचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 5:09 AM