नवी दिल्ली : विनाअनुदानित खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’खेरीज स्वत:ची पूर्वनियोजित प्रवेश परीक्षा घेण्यास मुभा देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. खासगी महाविद्यालयांनी घेतलेल्या किंवा त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या भवितव्याबाबत काही वकिलांनी स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर खासगी संस्थांना प्रवेश परीक्षा घेण्यास मुभा देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे न्यायमूर्ती ए.आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पीठाने स्पष्ट केले. अन्य एका महत्त्वपूर्ण घटनाक्रमात या पीठाने ज्या राज्यांनी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतल्या आहेत त्यांना सध्याच्या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यास मुभा देण्याच्या व्यवहार्यतेबाबत केंद्राकडून सूचना घ्याव्यात, असे निर्देश सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांना दिले. याशिवाय १ मे रोजी झालेली नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना २४ जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या नीट परीक्षेला बसण्याची मुभा देता येऊ शकेल काय, याबाबतची स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश कुमार यांना दिले. ज्या विद्यार्थ्यांनी राज्याकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रित केले; मात्र अर्ज भरूनही नीटची गांभीर्याने तयारी केली नाही, त्यांना नीटच्या दुसऱ्या परीक्षेला पुन्हा बसण्याची मुभा देण्यात यावी, असेही पीठाने म्हटले. देशभरातील सहा लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.
‘नीट’ खेरीज स्वतंत्र परीक्षा घेता येणार नाही
By admin | Published: May 06, 2016 2:21 AM