थिरुवनंतपूरम : दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या ‘ट्रान्सेंडन्स: माय स्पिरिच्युअल एक्स्पिरियन्सेस विथ प्रमुख स्वामीजी’ या अखेरच्या पुस्तकाच्या मल्याळी अनुवादाचा शनिवारी येथे आयोजित केलेला औपचारिक प्रकाशन समारंभ महिलांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर रद्द करण्यात आला. बोचासणवासी अक्षरपुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या प्रमुख स्वामींच्या सहवासातून व चर्चेतून अनुभवलेल्या आध्यात्मिक अनुभूती डॉ. कलाम यांनी या पुस्तकात कथन केल्या आहेत.डॉ. कमाल यांच्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचे श्रीमती श्रीदेवी एस.कार्था यांनी मल्याळीत भाषांतर केले असून त्रिचूर येथील ‘करन्ट बूक्स’ या प्रकाशन संस्थेने त्याचे प्रकाशन केले आहे. त्रिचूर येथील साहित्य अकादमी इमारतीमधील सभागृहात प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. स्वामीनारायण पंथाचे प्रतिनिधी म्हणून स्वामी ब्रह्मविहारी दास यांना निमंत्रित करण्यात आले होते.स्वामीनारायण पंथाचे स्वामी महिलांचा सहवास पूर्णपणे निषिद्ध मानतात व असा सहवास टाळण्यासाठी ते प्रसंगी अतिरेकी वाटावी एवढी काळजी घेत असतात. पुस्तकाच्या भाषांतरकर्त्या या नात्याने श्रीमती कार्था प्रकाशन समारंभास उपस्थित राहणे स्वाभाविक होते. कार्यक्रमासाठी आलेले स्वामी ब्रह्मविहारी दास हॉटेलमध्ये उतरले होते. स्वामीनारायण पंथाच्या लोकांनी प्रकाशन संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावून घेतले व पुस्तकाच्या लेखिका महिला असल्याने त्यांना व्यासपीठावर स्वामींच्या सोबत बसवू नये, असे त्यांना सांगण्यात आले.प्रकाशकांनी हा निरोप श्रीमती कार्था यांना कळविला व त्यांनी त्याची माहिती आपल्या फेसबूक पेजवर टाकली. केवळ मला व्यासपीठावर बसायला मनाई केली एवढेच नव्हे तर स्वामीजींना ‘विटाळ’ होऊ नये यासाठी यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या तीन रागांमधील आसने स्वामींच्या भक्तमंडळींसाठी राखून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी लिहिले.साक्षरता आणि महिला-पुरुष समानता याबाबतील अत्यंत जागृक व पुरोगामी अशा केरळमध्ये हा बुरसटलेला दुजाभाव सहन होण्यासारखा नव्हता. कार्था यांना सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळाला. अल्पावधीच काही महिला व तरुणांनी साहित्य अकादमीच्या इमारतीवर मोर्चा नेला. काही महिला कार्यकर्त्यांनी सभागृहात जाऊन पहिल्या रांगांमधील ासने बळकावली. एका महिला कार्यकर्तीने तर फेसबूकवर लिहिले-‘ आम्ही सर्वजणी कार्यक्रमाला जाऊन बसू. पाहू या स्वामींचे ब्रह्मचर्य त्यामुळे कसे भंग होते! हा सर्व प्रकार कळल्यावर स्वामी ब्रह्मविहारी यांनी जो काय संदेश घ्यायचा तो घेतला. ते कार्यक्रमाला न येता हॉटेलमध्येच बसून राहिले. नंतर ‘करंट बूक्स’ने प्रकाशन समारंभ रद्द झाल्याचे जाहीर केले व त्यामुळे उपस्थित झालेल्या वादाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ----------मुंबईतील महिला पत्रकारांचाही तोच अनुभवगांधीनगर येथे बांधलेल्या भव्य स्वामीनारायण मंदिराचे औपचारिक उद््गाटन होण्याआधी स्वामीनारायण संस्थेने मुंबईतील पत्रकारांना तेथे नेले होते. जे पत्रकार येणार आहेत त्यात कुमुद संघवी या महिला पत्रकारही आहेत, याची संस्थेच्या लोकांना आधीपासून कल्पना होती. पत्रकारांचा चमू मुंबईहून रेल्वेने अहमदाबादला गेला. आयआयएम, अहमदाबादच्या वसतिगृहात त्यांची निवासाची सोय करण्यात आली होती. बाजूच्या मैदानात स्वामीनारायण संस्थेने भव्य मंडप घातला होता. मुंबईपासून अहमदाबाद प्रवासासह इतर सर्व ठिकाणी संस्थेला कुमुद संघवी यांचे स्त्रित्व खटकले नाही. प्रमुख स्वामींना भेटायला जाताना मात्र त्यांना मज्जाव करण्यात आला. तेव्हाही पत्रकारांनी याचा निषेध करून प्रमुख स्वामींच्या भेटीवर बहिष्कार टाकला होता.(वृत्तसंस्था)
एपीजे अब्दुल कलाम यांच्या मल्याळी पुस्तकाचे प्रकाशन रद्द
By admin | Published: September 26, 2015 10:05 PM